पांडुरंगा, मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, मागणे मान्य करण्यास सांग: शेट्टी

अभय जोशी
सोमवार, 16 जुलै 2018

श्री. शेट्टी यांनी काल रात्री बाराच्या सुमारास पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात येऊन श्रींच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करुन आंदोलनाची सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार श्री.शेट्टी हे काल रात्री बारा वाजता येथे आले होते.

पंढरपूर : दूध दर वाढी साठी सरकारचे उंबरठे झिजवून झिजवून आम्ही दमलो. परंतु हे सरकार आम्हाला न्याय देत नाही. पांडुरंगा तूच आता न्याय दे. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री तुझ्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यांना सुबुद्धी दे आणि आमचे मागणे मान्य करण्यास सांग.... .असे साकडे खासदार राजू शेट्टी यांनी पांडुरंगाच्या चरणी घातले.शासन प्रतिलिटर पाच रुपये दूध दर वाढ जाहीर करत नाही तो पर्यंत आपले हे आंदोलन चालू राहील असा निर्धार त्यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केला. 

श्री. शेट्टी यांनी काल रात्री बाराच्या सुमारास पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात येऊन श्रींच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करुन आंदोलनाची सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार श्री.शेट्टी हे काल रात्री बारा वाजता येथे आले होते. श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरातील मुख्यमुर्तीवर दुग्धाभिषेक करण्यास मंदिर प्रशासनाने मनाई केल्यामुळे संत नामदेव पायरी जवळ श्री विठ्ठल रुक्‍मिणींच्या लहान मूर्ती आणून त्यांना दुग्धाभिषेक घालून खासदार राजू शेट्टी यांनी दूध दरवाढी साठीचे आंदोलन सुुरु केले. 

पत्रकारांशी बोलताना श्री.शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचा उत्पादन खर्च प्रतिलिटर 35 रुपये असताना निम्म्या दराने म्हणजे 17 ते 18 रुपये दराने दूधाची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने दर वाढ करावी अशी आमची रास्त मागणी आहे. परंतु या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे. आम्ही आंदोलन करणार म्हटल्यावर आज सकाळ पासून पोलिसांचा वणवा आमच्या मागे सुरु झाला आहे. आंदोलन करायचे नाही अशी दडपशाही केली जात आहे. एक प्रकारे आणीबाणी सारखी परिस्थिती दिसत आहे. परंतु आम्ही जो पर्यंत शासन प्रतिलिटर पाच रुपये दर वाढ जाहीर करत नाही तो पर्यंत आंदोलन थांबवणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी पंढरपूर तालुक्‍यातील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Raju Shetty talked about Milk Agitation in Pandharpur