
Raju Shetti : ब्रिजभूषण यांच्या विरोधात स्वाभिमानीने ठोकला शड्डू, राजू शेट्टी यांचं राष्ट्रपतींना पत्र
भाजप खासदार आणि रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक छळाचा आरोप आहे. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून कुस्तीपटू अनेक दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. याप्रकरणी गृहमंत्री गप्प असून अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहले आहे.
राजू शेट्टी म्हणाले, कुस्ती हा भारतातील लोकप्रिय पारंपरिक खेळ आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब,आणि राजस्थान मध्ये खूप हा खेळ जास्त लोकप्रिय आहे. शाहू महाराजांनी कुस्ती खेळाला खऱ्या अर्थाने राजाश्रय दिला. कुस्ती खेळ म्हणजे शरीराच्या मजबुतीसाठी आणि तंदुरुस्तीसाठी खेळला जातो. गेल्या दोन महिन्यापासून याच कुस्तीबाबत देशपातळीवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप होऊनही त्यांच्यावर सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेमुळे देशाची व विशेष करून कुस्ती क्षेत्राची मोठी बदनामी झाली आहे. यामुळे दुसऱ्यावर अन्याय झाल्यानंतर मदतीसाठी धावणारी व्यक्ती म्हणून पैलवानांना ओळखले जाते. पण देशात सुरू असलेल्या या आंदोलनात याच पैलवानांची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे.

ब्रिजभूषण सिंह हे दोषी असतील तर सरकार याकडे दुर्लक्ष का करत आहे. सरकारने याबाबत लक्ष घालून संबधित कुस्तीपटूंना न्याय द्यावा व ब्रीजभूषण यांचेवर कारवाई करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
सरकार ही घटना गांभीर्याने घेत नसल्याने कोल्हापूरसह राज्यातील पैलवानांनी याबाबत एकत्र येवून आवाज उठविणे गरजेचे आहे. निश्चीतच या प्रश्नावर मी राष्ट्रपती यांच्याकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यापुढे या लढाईत स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्यासोबत एक पाऊल पुढे असेल, असे देखील राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.