राज्यसभा निवडणूक : एकेका मतासाठी आघाडी-भाजपची लढाई

रणनीतीच्या अंमलबजावणीसह चुका टाळण्याला प्राधान्य
Rajya Sabha elections battle mahavikas aghadi BJP vote  Aditya Thackeray  Laxman Jagtap Mukta Tilak congress
Rajya Sabha elections battle mahavikas aghadi BJP vote Aditya Thackeray Laxman Jagtap Mukta Tilak congresssakal

मुंबई : मतांच्या जुळवाजुळवी नंतर ‘वजाबाकी’ होणार नाही, याची दक्षता घेत, महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांनी शुक्रवारी राज्यसभेसाठी मतदान केले. विशेष म्हणजे रणनीतीप्रमाणे वेळेत आणि चुका टाळून मतदानाला साऱ्याच पक्षांचे प्राधान्य राहिले. आघाडीच्या दोघा मतदारांनी मतपत्रिका दाखविण्याऐवजी त्या इतर नेत्यांच्या हातात दिल्याने भाजपने आक्षेप घेतला. तर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे दोन मतपत्रिका आल्याकडेही भाजप नेत्यांनी लक्ष वेधले. भाजपच्या एका मतदानावरही काँग्रेसने बोट ठेवले. आजारी असतानाही भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी रुग्णवाहिकेतून येत मतदानाचा हक्क बजाविला.

दरम्यान, या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आणि अपक्ष २८५ अशा एकूण आमदारांनी मतदान केले. छोट्या पक्षांनी मतदान करेपर्यंत प्रमुख पक्षांची धाकधूक वाढवली होती. परंतु, ज्या-त्या पक्षांना दिलेल्या शब्दांप्रमाणे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांनी मतदानाला हजेरी लावली. विधानभवनात सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरवात झाली. नियोजनप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते सकाळीच आठ-साडेआठ वाजल्यापासूनच विधानभवनात आले होते. त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेचे आमदार बसमधून मतदानासाठी आले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य नेते आले. ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून पावणेअकरानंतर शिवसेनेच्या आमदारांनी मतदान केले. विधानभवनात येण्याआधी आणि आल्यानंतरही सर्वच पक्षाच्या आमदारांना थेट विधानभवनात नेण्यात येत होते.

शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हेही वॉकरच्या साहाय्याने विधानभवनात आले. आपल्या आमदारांना वेळेत आणून मतदान करण्यात सर्वपक्षीयांची रणनीती यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, शेवटपर्यंत ‘सस्पेन्स’ ठेवलेल्या बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी दुपारी दोन-सव्वादोन वाजता विधानभवनात येऊन मतदान केले. पवार, पाटील यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि काही नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात मतदान केले. मतदानानंतर बहुतांशी आमदारांनी मुंबई सोडली.

जगताप, टिळक यांचे रुग्णवाहिकेतून आगमन

आजारी असूनही कार्डियाक ॲम्ब्युलन्समधून पुणे-मुंबई असा तीन-सव्वातीन तासांचा प्रवास करून दुपारी सव्वाबारा वाजता मतदानासाठी आलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांचे विधानभवनाच्या दारातच फडणवीस यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केले. टाळ्या वाजवून भाजप आमदारांनी जगताप यांना ‘सॅल्यूट’ केला. ॲम्ब्युलन्समधून उतरविल्यानंतर जगताप यांना व्हिल चेअरवरून थेट मतदानाच्या ठिकाणी नेण्यात आले. त्याआधी सकाळी सव्वा दहा वाजता मुक्ता टिळक याही ॲम्ब्युलन्समधून आल्या होत्या. आजारी असल्याने सध्या जगताप आणि टिळक यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जल्लोषाला परत येतो : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार नाही पण सभागृहाचे नेते आणि सत्ताधारी आघाडीचे प्रमुख या नात्याने ते विधानभवनात दुपारी हजर झाले. मतदान संपेपर्यंत ते बसून होते. शेवटचे मत टाकले ते काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी. त्यानंतर मुख्यमंत्री बाहेर पडले. गाडीत बसताना विजय महाआघाडीचाच होईल. मी मतमोजणीच्या वेळेस परत येतो, असे सांगून ते बाहेर पडले. त्यानंतर मतदान रखडल्याने ते रात्री उशिरापर्यंत परतलेच नाहीत.

मोहिते, बनसोडेंचे मतदान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोट दाखवून मतदानापासून लांब राहण्याचा पवित्रा घेतल्याची चर्चा असलेले खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांनी दुपारी मतदान केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहिते यांच्याशी चर्चा करून मतदानासाठी बोलाविल्याचे सांगण्यात आले. तेव्हाच पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेही नाराजीतून मतदानासाठी येणार नसल्याची चर्चा पसरली. त्यामुळे बनसोडे यांच्याबाबतचे गूढ वाढले असतानाच बनसोडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. आजारी असल्याने उशिराने मतदानासाठी आल्याचे बनसोडे यांनी स्पष्ट केले.

एमआयएम’ची मते काँग्रेसला

तटस्थ न राहता एमआयएमने दोन आमदारांची मते सत्तारूढ आघाडीला द्यावीत, या प्रयत्नांना अखेर यश आले. एमआयएमच्या दोन्ही आमदारांनी काँग्रेसचे प्रतापगढी यांना मतदान केले. काल रात्री एमआयएमने मागण्यांचे पत्रक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते. ते मान्य केले जाईल काय याबद्दल संदिग्धता होती पण दोन्ही बाजूंनी सामोपचाराची भूमिका घेतली. एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्यावे अन् त्या ऐवजी राष्ट्रवादीने दोन मते शिवसेनेला द्यावीत, असे ठरले होते. मात्र, एमआयएमने मुस्लिम उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना आम्ही मते टाकू असे सांगितले.

देशमुख, मलिक मतदानापासून वंचित

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे मतदानापासून अखेर वंचित राहिले. मलिक यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. निवडणुकीत पोलिस बंदोबस्तात सहभागी होऊन मतदान करता यावे, यासाठी परवानगी देण्याची मागणी मलिक यांनी केली होती. आम्हाला जामीन नको, केवळ मतदान करायला परवानगी हवी, असा युक्तिवाद ॲड. अमित देसाई यांनी केला होता. यावर न्या. पी. डी. नाईक यांच्यापुढे सुनावणी झाली. मात्र तांत्रिक कारणामुळे हा अर्ज नामंजूर करण्यात आला. यामध्ये मतदान करण्यासाठी जामिनावर सोडण्याच्या मागणीचा अर्ज संबंधित योग्य न्यायालयात करावा, अशी मुभा देऊन न्यायालयाने याचिका नामंजूर केली; तर देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही.

फडणवीस दिवसभर बसून

आजची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने सकाळीच विधानभवनात दाखल झालेल्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तेथेच ठिय्या दिला.ए काही मिनिटांसाठी ते बाहेर गेले नाहीत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही तेथेच बसून होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com