esakal | राज्यसभेवर सातव यांच्या पत्नीची वर्णी? अनेकजण इच्छुक
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Party

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे १६ मेपासून महाराष्ट्रातील एक जागा रिक्त झाली आहे.

राज्यसभेवर सातव यांच्या पत्नीची वर्णी? अनेकजण इच्छुक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी येत्या चार ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर होईल. निवडणूक आयोगाने गुरुवारी महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, आसाम, मध्य प्रदेश आणि तमिळनाडूमधून राज्यसभेवर रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे १६ मेपासून महाराष्ट्रातील एक जागा रिक्त झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असणारे राजीव सातव यांची पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांनाच राज्यसभेत संधी दिली जावी, अशी पक्षाच्या एका गटाची मागणी मागणी आहे.

डॉ. प्रज्ञा सातव यांची नुकतीच महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांना गेल्यावेळी हुकलेली संधी मिळणार की राजीव सातव यांच्या जागी ओबीसी चेहऱ्याचाच विचार होणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र सातव राष्ट्रीय राजकारणात व्यग्र असल्याने त्यांच्या हिंगोली या मतदारसंघाची जबाबदारी त्यांची पत्नीच सांभाळत होत्या. गांधी कुटुंबासोबत सातव कुटुंब एकनिष्ठ असल्याने सातव यांच्या पत्नीला राज्यसभेत संधी मिळावी, असा दावा काँग्रेसच्या एका गटाकडून केला जात आहे.

हेही वाचा: पुण्यात संचारबंदी नाही, जमावबंदी लागू; वाचा काय आहे आदेश?

दरम्यान, या जागेसाठी काँग्रेसमधील अनेक दिग्गज इच्छुक असल्याची चर्चा आहे. यात पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक, संजय निरुपम, मिलिंद देवरा, रजनी पाटील यांची नावे असल्याचं समजतं. तसंच राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनाही महाराष्ट्र किंवा तामिळनाडुमधून संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीची अधिसूचना १५ सप्टेंबर रोजी जारी होईल. २२ सप्टेंबर अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना २७ सप्टेंबरपर्यंत त्यांचे अर्ज मागे घेता येतील. चार ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून, सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. पश्‍चिम बंगालमधून राज्यसभेवर गेलेले मानस रंजन भुनिया, तसेच आसाममधील बिस्वजित दोईमरी, तमिळनाडूतील के. पी. मुनुसामी, आर. वैथिलिंगम, मध्य प्रदेशमधील थावरचंद गेहलोत यांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत.

loading image
go to top