मध्यस्थी करण्यास अण्णा तयार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

शेतकऱ्यांच्या संपाबाबत भूमिका; मुख्यमंत्र्यांशी दोन वेळा चर्चा

शेतकऱ्यांच्या संपाबाबत भूमिका; मुख्यमंत्र्यांशी दोन वेळा चर्चा
राळेगणसिद्धी - सरकारशी चर्चेसाठी शेतकरी इच्छुक असल्यास मी मध्यस्थी करण्यास तयार आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने मी सरकारशी चर्चा करीन. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी दोन वेळा चर्चा झाली; तेही चर्चेला तयार आहेत, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी जाहीर केले.

शेतकऱ्यांच्या संपाच्या भूमिकेशी सहमत असल्याचे सांगत हजारे यांनी आपली भूमिका पत्रकाद्वारे जाहीर केली. त्यांनी म्हटले आहे, की शेतकरी आंदोलनाबाबत काही जणांनी माझ्याशी चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांशी माझी दोन वेळा दूरध्वनीवर चर्चा झाली. ते चर्चेला तयार आहेत. त्यामुळे हा प्रश्‍न कसा सोडवायचा, यावर चर्चा होऊ शकते. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची तयारी असेल, तर मी बैठकीसाठी उपस्थित राहीन. शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी पुढील काळात राजकारणविरहित प्रदीर्घ आंदोलनाची दिशा ठरविणे आवश्‍यक वाटते.

शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव मिळणे गरजेचे आहे. तो मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. बॅंक किंवा सावकाराकडून घेतलेले कर्ज त्याला फेडता येत नाही. या नैराश्‍यातून तो आत्महत्या करीत आहे, असे सांगून हजारे यांनी म्हटले आहे, की सहनशीलता संपल्यानेच शेतकरी नाइलाजाने रस्त्यावर उतरला आहे. कुटुंब व पशुधन वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलो, असे सांगत तो सरकारला विनंती करीत आहे.

सरकारने मागण्यांची दखल घ्यावी
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेला सरकार दाद देत नसेल, तर नाइलाजाने कायदा हातात घेण्याची वेळ येते. असे घडणे समाज व राष्ट्रहिताचे नाही. राष्ट्रीय संपत्ती आपलीच आहे. त्यासाठी आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने जावे. सरकारने वेळीच विचार करून शेतकऱ्यांच्या मागण्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

आमच्या संस्थेलाही शेतीत नुकसान
हजारे यांनी म्हटले आहे, "शेतमालाला बाजारभाव नसल्यास शेतकऱ्याची कशी वाताहत होते, हे मी लहानपणापासून अनुभवले आहे. आम्ही संस्थेतर्फे सेंद्रिय शेती केली; पण शेतमालाला भाव नसल्याने दीड लाख रुपये खर्चून 25 हजार रुपयांचेही उत्पन्न मिळाले नाही. संस्था म्हणून आम्ही ते सहन केले. बॅंक किंवा सावकारी कर्ज घेऊन शेतीत पैसे घालणाऱ्या शेतकऱ्यास ते सहन करता येत नाही.'

Web Title: ralegansiddhi maharashtra news Anna ready to intervene