सरकारच्या आश्‍वासनावर विश्‍वास नाही - हजारे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

राळेगणसिद्धी - 'सरकारच्या आश्‍वासनावर माझा आता विश्‍वास राहिला नाही. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही ठोस कारवाई करणार, हे मला अगोदर सांगा. सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्यातच मागण्यांबाबत ठराव मांडा,'' अशी मागणी करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजही, दुसऱ्यांदा दिल्ली येथील उपोषण व आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पंतप्रधान कार्यालयाचा निरोप घेऊन येत काल रात्री व आज दुपारी हजारे यांच्याशी राळेगणसिद्धी येथे चर्चा केली.

शेतमालाला दर मिळावा, लोकपाल व लोकायुक्त यांसह विविध मागण्यांसाठी हजारे येत्या ता. 23पासून दिल्लीत उपोषण करणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर गिरीश महाजन यांनी काल व आज हजारे यांच्याशी राळेगणसिद्धी येथे येऊन चर्चा केली. महाजन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निरोप घेऊन येत, "तुम्ही आंदोलन करू नका. पंतप्रधान कार्यालयाकडून तुम्हाला लेखी पत्र देण्यात तयार आहे.

पंतप्रधान शेतकऱ्यांसाठी चांगली कामे करीत आहेत. त्यांनी शेतकरीहिताचे व देशहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांची विनंती आपण मान्य करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यासही तयार आहेत,' असे सांगून महाजन यांनी अण्णांकडे आंदोलन मागे घेण्याचा आग्रह धरला. अण्णा यांनी मात्र महाजन यांची विनंती मान्य केली नाही.

रामलीला मैदानावर आंदोलनाला परवानगी
अण्णा हजारे यांनी आंदोलनासाठी जागा देण्याकरिता पंतप्रधान, गृहमंत्री, दिल्लीचे पोलिस आयुक्त यांच्यासह संबंधितांना आतापर्यंत जवळपास 42 वेळा पत्र लिहिले. मात्र, अगदी कालपर्यंत आंदोलनाला अधिकृतपणे जागा दिलेली नव्हती. मात्र, काल (सोमवारी) रात्री आंदोलनाला रामलीला मैदानावर परवानगी दिली असल्याचे दिल्ली पोलिसांनी पत्र पाठवून स्पष्ट केले आहे.

Web Title: ralegansiddhi news government trust anna hazare