रामायणे... प्रांतोप्रांतीची, देशोदेशीची 

प्रा. जी. एन. हंचे 
मंगळवार, 4 एप्रिल 2017

दोन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या दोन महाकाव्यांपैकी वाल्मीकी रामायण हे एक. दोन हजार वर्षे देशाच्या राष्ट्रीय, सांस्कृतिक वैभवाला या रामायणाने शोभा आणली. वाल्मीकी रामायणाचे सात खंड आहेत. ते 24 सहस्र श्‍लोकांनी बनलेय. ते एका लेखकाने योजनाबद्ध रीतीने सुरेख रचलेले अद्‌भुतरम्य महाकाव्य आहे. भारत व देशोदेशीच्या विविध रामायणांचा हा संक्षिप्त परिचय, रामनवमीच्या निमित्त... 

रामायणात एका बाजूला लढणारा सेनापती मानव (राम) असून, दुसऱ्या बाजूला लढणारा मुख्य शत्रू राक्षस (रावण) आहे. ही कल्पित कथा आहे, जे उत्कृष्ट काव्य आहे. संस्कृत काव्यरचनेचा पहिला आदर्श म्हणून त्याला मान्यता मिळाली. म्हणूनच वाल्मीकींना आदिकवी म्हणतात. पुढे यात वारंवार बदल होत गेले. भर पडत गेली. मूळ विषयात अनेक बदलही झाले. संस्कृतमध्ये वीसपेक्षा जास्त रामायणे झाली. रामायणात प्रथम राम हा पराक्रमी व आदर्श माणूस दाखवला. पुढे तो विष्णूचा 7 वा अवतार म्हणून दाखवला. 

भारतासह अनेक राष्ट्रांतील जनतेच्या जीवनावर व विचारावर इतका खोल प्रभाव पाडणारा या ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ नाही. रामायण महाभारतापूर्वी अस्तित्वात आले. पुढे रामायणे विविध भारतीय भाषांत लिहिली गेली. तुलसीदासांचे रामचरितमानस, शिखांचे दहावे गुरू गोविंददास यांचे रामावतार, तमिळमधील कंबनांचे कंब रामायण, कन्नड भाषेतील कौशिक रामायण, तेलगू भाषेतील रंगनाथ रामायण, भास्कर रामायण, मराठी संत एकनाथांचे भावार्थ रामायण, रामदासांची सुंदर व युद्ध अशी दोन कांडे, मोरोपंतांच्या रचना अशी ही रामायणे नेपाळ, श्रीलंका, जपान, मलेशिया, फिलिपीन्स, थायलंड, ब्रह्मदेश या देशांतही पोचली. याच्या इंग्रजी आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्यात. 

आजपर्यंत अशी 21 लेखकांनी लिहिलेली रामायणे प्रसिद्ध झालीत. ती अशी आहेत जी त्यांच्या नावानेच ओळखली जातात. व्यासोक्‍त, वशिष्ट, वाल्मीकी, शुभरामायण, हनुमंताचे नाटक, बिभिषण, ब्रह्म, शिव, अगस्ती, अध्यात्म, शेष, शैव, आगस्त्य, कूर्म, स्कंद, पौलस्ती, अरुण, पद्म, भरत, धर्मरामायण, आश्‍चर्य या रामायणांची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत, ज्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिले पाहिजे. 

वशिष्ट रामायणात रामाच्या 12 नावांचा उल्लेख आहे. राम, श्री राम, तुळशी त्रिभुवन राम, अहिल्योद्धारक राम, पतितपावन राम, जानकीजीवन राम, मारिकामर्दन राम, कौशल्यानंदन राम, सीतापतेराम, मारुतीदर्शन राम, दाशरथे राम, सीताशोधन राम. 

विविध देशांतील रामायणपंथी नावे अशी ः ब्रह्मदेश : रामगाथन, इंडोचायना : रे आयकरे, जावा : सेरीराम, रामायण काक विन, सयाम- राम कियेना, तुर्कस्तान : खोतानी रामायण, श्रीलंका : रामायण पद्मचारिक, मलाया : किदायत सेरिराम. 

Web Title: Ram Navami special

टॅग्स