
'आज देशातील मशिदींवर संकट आलंय. नमाज पठणापासून रोखलं जात आहे.'
मी माझ्या आईला गमावलंय; नमाज पठण करताना इम्तियाज जलील भावूक
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नुकतीच औरंगाबादमध्ये (Aurangabad) जाहीर सभा झाली. या सभेकडं सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेत राज ठाकरेंनी मागील दोन सभांमधून आघाडी सरकारवर ताशेरे ओढलेत. याआधी मीच केवळ भोंग्यांबद्दल बोललो नव्हतो. पण, मी पर्याय दिलाय. जर 4 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की, मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावावी, असा थेट इशारा त्यांनी दिलाय.
दरम्यान, आज देशभरात ईद मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे. औरंगाबादच्या ईदगाह (Eidgah Ground) मैदानावरही दोन वर्षानंतर हजारो मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी जमा झाले आहेत. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) हेदेखील उपस्थित होते. सकाळी नऊच्या सुमारास मुस्लिम भाविकांनी नमाज पठणास सुरुवात केली. यावेळी खासदार इम्तियाज जलील अत्यंत भावूक झाले. नमाज पठण सुरु असतानाच त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. एकीकडं नमाज पठण सुरु होतं, तर इकडं खासदार जलील डोळ्यांतील अश्रू पूसत होते. मात्र, नमाज पठण झाल्यानंतर स्वतःच्या भावना आवरत खासदार जलील यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना अश्रू येण्याचं कारण सांगितलं.
नमाज पठणानंतर माध्यमांशी बोलताना खासदार जलील म्हणाले, मागील दोन वर्षात कोरोना संकटामुळं आपण अनेक जवळच्या लोकांना गमावलंय. दोनच महिन्यांपूर्वी मी माझ्या आईला गमावलं. आईशिवाय ही पहिली ईद आहे. त्यामुळं नमाज पठण करताना आठवणींचा बांध फुटला. ते पुढं म्हणाले, आज देशातील मशिदींवर संकट आलंय. नमाज पठणापासून रोखलं जात आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी आम्ही सर्वांनी दुआ मागितली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, देशात शांतता व बंधुप्रेम राहण्यासाठी आम्ही प्रार्थना केली, असंही त्यांनी नमूद केलं.
Web Title: Ramadan Eid Imtiaz Jaleel Became Emotional While Reciting Namaz At Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..