आचरेकर सरांच्या कार्याचा सरकारला विसर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

मुंबई - क्रिकेटचे ‘द्रोणाचार्य’ अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. ‘पद्म’ पुरस्कारप्राप्त अभिनेत्री श्रीदेवीच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या तातडीने सूचना देणाऱ्या राज्य सरकारला अनेक दिग्गज खेळाडू घडवणाऱ्या ‘महागुरू’ला त्याच रिवाजानुसार अखेरचा निरोप देण्याचा विसर पडला. सरकारला आचरेकर यांच्या कार्याचे विस्मरण झाल्याची सर्व स्तरांतून टीका होऊ लागताच सरकारने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला खरा, पण ही केविलवाणी धडपड करणाऱ्या दोन मंत्र्यांच्या वक्तव्यांमध्ये कमालीचा विरोधाभास होता.  

अंत्यविधी सुरू असताना प्रकाश महेता स्मशानभूमीत आले. ते म्हणाले, की आचरेकर यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणे गरजेचे होते. मात्र विसंवादामुळे चूक झाली. झाल्या प्रकाराबाबत मी खेद व्यक्त करतो.

राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांनी मात्र ‘पद्म’ पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत, हा नियम नसल्याचा दावा केला. तर अशा व्यक्तीच्या निधनानंतर राज शिष्टाचाराचा भाग म्हणून तहसीलदार किंवा समकक्ष अधिकारी सरकारच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो.

निधनाबाबत नातेवाइकांनी संबंधित जिल्हाधिकारी किंवा निवासी जिल्हाधिकाऱ्यांना कळवावे, असे संकेत आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आवश्‍यक कृती करत असते, असे राजशिष्टाचार विभागामार्फत सांगण्यात आले.

गृहनिर्माणमंत्री तातडीने हजर
आचरेकर यांच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेत त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्काराच्या वेळी सचिन तेंडुलकर, प्रवीण आमरे यांच्यासह अनेक खेळाडू उपस्थित होते. अंत्यविधीसाठी सरकारच्या वतीने अधिकृतपणे कोणीही उपस्थित नव्हते. ही बाब लक्षात येताच गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांना तातडीने पाठवले.

Web Title: Ramakant Acharekar Work Government