आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणे शक्य नाही : रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

आज महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावे अशी विनंती केली. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले  म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना अनुभव नसल्याने ते मुख्यमंत्री हाेऊ शकत नाहीत.

मुंबई : आज महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावे अशी विनंती केली. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले  म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना अनुभव नसल्याने ते मुख्यमंत्री हाेऊ शकत नाहीत.  

तसेच यावेळी राज्यपाल हे दोन दिवसात शिवसेना आणि भाजपला निमंत्रण देतील, असं माध्यमांशी बोलताना आठवले यांनी सांगितलं. शिवसेनेने भाजपची ऑफर स्वीकारावी असा सल्लाही त्यांनी दिला.

‘शिवसेना काँग्रेससोबत जाणे योग्य नाही, शिवसेनेने भाजपसोबत जायला हवं. भाजपची ऑफर स्वीकारुन शिवसेनेने सत्तेत यावं’, असं आवाहन आठवले यांनी शिवसेनेला केलं. तसेच, राज्यपाल हे येत्या दोन दिवसात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना निमंत्रण देतील, असंही त्यांनी सांगितलं.

संजय राऊत यांना टोला -
रामदास आठवले यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. संजय राऊत यांनी तोडण्याची भूमिका घेण्यापेक्षा जोडण्याची भूमिका घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राष्ट्रपती राडवटीच्या वक्तव्यावरही रामदास आठवले यांनी स्पष्टीकरण दिलं. राष्ट्रपती राजवट ही सरकार बनलं नाही, तर कायद्यानुसार लागू होऊ शकते, असं ते म्हणाले. तसेच, आमच्याकडे 120 जागा आधीच आहेत, आता बहुमत कसं मिळवायचं याचं प्लॅनिंग सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

'आदित्य यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं'
शिवसेना भाजपमध्ये ज्या मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे त्यावरही रामदास आठवले यांनी भाष्य केलं. आमदार आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच, सत्ता वाटपाच्या मुद्यावरही आठवले यांनी खुलासा केला. शिवसेनेला पूर्वी 13 मंत्रिपद होते, आता त्यांना 16 मंत्रिपदं देण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

त्याशिवाय, भाजप आणि शिवसेनेच्या 50-50 च्या फॉर्म्युलावरही रामदास आठवले यांनी वक्तव्य केलं. ’50-50 मध्ये जागांबाबत बोलणी झाली होती, मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही चर्चा नव्हती’, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. तसेच, ‘1995 मध्ये शिवसेनेच्या जागा जास्त होत्या, म्हणून त्यांचा मुख्यमंत्री झाला. मात्र, आज आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याबाबत शिवसेनेचं मत साध्य होणार नाही’, असं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.

राज्यपालांच्या भेटीदरम्यान, राज्यातील ओल्या दुष्काळाबाबतही चर्चा झाल्याचं आठवले यांनी सांगितलं. शेतकरी दुष्काळामुळे हवालदील झाले आहेत, पीकं उद्ध्वस्त झाली आहेत, अशा शेतकऱ्यांना मदत करावी ही मागणी राज्यपालांतकडे केल्याचं आठवले यांनी सांगितलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramdas athawale meet governor bhagat singh koshyari to talked about maharashtra govt establishment