
Uddhav Thackeray : ...त्यामुळे ठाकरे पंतप्रधानपदासाठी सक्षम नाहीत; केंद्रीय मंत्र्यांचं विधान
नवी दिल्ली - सध्या देशभरात विरोधकांकडून एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर काही नेते तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात आहेत. आता लोकसभा निवडणूक अवघ्या वर्षभरावर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष ताकद लावताना दिसत आहेत. यात उद्धव ठाकरे गट देखील आगेकूच करताना दिसत आहे. त्यातच केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.
रामदास आठवले म्हणाले की, देशात सध्याच्या घडीला १५ ते २० नेते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे. या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करवा लागणार आहे. मात्र पंतप्रधान मोदींशी सामना करणे येड्यागबाळ्याचे काम नाही. मोदींनी लोकांची कामं केली, म्हणून आम्हाला २०२४ मध्ये देखील यश मिळणार आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना आठवले म्हणाले की, त्यांना मुख्यमंत्रीपद सांभाळता आले नाही. त्यामुळे ते पंतप्रधानपदासाठी सक्षम नाहीत, असा टोला आठवले यांनी लगावला.
सहानुभूतीच्या मुद्दावर आठवले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनाच जनतेची सहानुभूती आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्यानेच शिंदेंनी बंड केला, असंही आठवले यांनी नमूद केलं.