"रॅन्समवेअर'ने बॅंकांना धडकी 

"रॅन्समवेअर'ने बॅंकांना धडकी 

मुंबई - रॅन्समवेअर व्हायरसने बॅंकिंग क्षेत्राला धडकी भरवली असून व्हायरसमुळे बॅंकिंग यंत्रणेत अडथळा येऊ नये, म्हणून रिझर्व्ह बॅंकेने एटीएम यंत्रणा तातडीने अद्ययावत करण्याचे आदेश बॅंकांना दिले आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता.15) देशातील बहुतांश बॅंकांनी खबरदारीचा उपाय म्हणून एटीएम सेवा बंद ठेवण्याला प्राधान्य दिले. 

बॅंकांनी उचललेल्या पावलामुळे देशभरातील सुमारे 60 टक्के एटीएम बंद होती. रॅन्समवेअर व्हायरसचा प्रभाव आणि एटीएम यंत्रणा अद्ययावत करण्यास वेळ लागणार असल्यामुळे आणखी दोन ते तीन दिवस एटीएम सेवेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

भारतात एकूण दोन लाख 25 हजार एटीएम आहेत. तब्बल 60 टक्के एटीएम विंडोज एक्‍सपी प्रणालीवर काम करत आहेत. ही प्रणाली कालबाह्य झाल्याने सायबर हल्ल्याला बळी पडू शकते, असा संशय रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केला आहे. एटीएम संवेदनशील असून त्या त्यापार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बॅंकांनी एटीएम यंत्रणा तातडीने अद्ययावत करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने दिले आहेत. 

सॉफ्टवेअर निर्मात्या मायक्रोसॉफ्टनेही विंडोजवर अवलंबून असलेली एटीएम अद्ययावत करण्यासाठी विशेष सुरक्षा "पॅच' जारी केला आहे. दरम्यान, एटीएममध्ये कोणताही डेटा नसल्याने ग्राहकांची माहिती सुरक्षित असल्याचा दावा एटीएम व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांनी केला आहे. 

एटीएम अतिसंवेदनशील 
एटीएमममधून दररोज हजारो कार्डांच्या माध्यमातून पैसे काढले जातात. त्यामुळे एटीएम यंत्रणा अतिसंवेदनशील आहे. सहा महिन्यांपूर्वीच सायबर हल्ल्यामुळे देशभरातील तब्बल 32 लाख डेबिट कार्ड बाधित झाली होती. सायबर हल्ल्याने सर्वच प्रमुख बॅंकांच्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे "एटीएम"सारख्या अतिसंवेदनशील यंत्रणेला सायबर हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्याचे बॅंकांसमोर आव्हान आहे. 

गृह विभागाची देखरेख 
एटीएम सेवेचा संभाव्य सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी बॅंकांना एटीएम सेवा अद्यायावत करण्याच्यादृष्टीने काही बॅंकांनी एटीएममध्ये बंद ठेवल्याचे गृह विभागाने म्हटले आहे. "रॅनसम्वेअर व्हायरस"मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नजर ठेवल्याचे गृह विभागाने म्हटले आहे. 

ग्राहकांची दुहेरी कोंडी 
चलन तुटवड्याने हैराण झालेल्या ग्राहकांच्या अडचणींमध्ये सायबर हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये चलनाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. निमशहरी भागात चलन पुरवठ्याअभावी एटीएम सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आता रैनसमवेअर व्हायरसमुळे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यासाठी बॅंकांनी एटीएम बंद ठेवली आहेत. परिणामी ग्राहकांचे पैशांअभावी हाल होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com