
Rangpanchami 2023 : महिलांसाठी वेळ राखीव असलेली नाशिकची पेशवेकालीन रंगपंचमी इतकी खास का?
तूम्ही आज उठल्यापासून रंगांमध्ये भिजत असाल. मित्रांसोबत डिजे लावून रंग खेळत असाल. किंवा हलगीच्या ठेक्यावर नाचत कुटुंबासोबत रंगले असाल. सगळीकडे अशीच रंगंपंचमी साजरी होते. त्यात वेगळं काही नाही. पण असं नाहीय. आपल्याच राज्यातल्या नाशिक शहरात रंगपंचमी वेगळी असते.
नाशिक शहराला पेशवाकालीन रंगपंचमीची परंपरा लाभली आहे. पेशवेकालीन वेगळी रंगपंचमी साजरी करण्यासाठी आजही तिथे चौका-चौकात गर्दी होते. काय आहे ती परंपरा पाहुयात.
पेशवेकाळात रहाड रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत. जुने नाशिक, पंचवटी भागात पेशव्यांनी ठिकठिकाणी रहाडी तयार करून ठेवल्या आहेत. कालांतराने प्रत्येक रहाडीचा मान वेगवेगळ्या कुटुंबीयांना देण्यात आला. शहरात पूर्वी १६ रहाडी होत्या. सध्या त्यातील केवळ पाच रहाडी उघडल्या जातात.
सर्वाधिक रहाडी जुने नाशिकमध्ये आहे. जुने नाशिक येथे तीवंदा चौक, जुनी तांबट गल्ली, दिल्ली दरवाजा, काझीपुरा दंडे हनुमान मंदिर समोर तसेच पंचवटी शनी चौक अशा पाच रहाडी उघडत असतात. तर सुंदरनारायण मंदिर परिसर, सरदार चौक, राममंदिर, मधली होळी, रोकडोबा तालीम, भद्रकाली भाजी मार्केट, फुले मार्केट, कठडा शिवाजी चौक, डिंगरअळी चौक या भागातील रहाडी अनेक वर्षापासून बंद आहे.
रहाडींचे रंगही ठरलेले असतात
प्रत्येक रहाडीचे रंग ठरलेले आहेत. दिल्ली दरवाजा येथील रहाडीत केसरी, तिवंदा पिवळा, जुनी तांबट गल्ली केसरी, शनी चौक गुलाबी, काझीपुरा केसरी असे रंग आहेत. काझीपुरा आणि दिल्ली दरवाजा येथील रहाडींमध्ये फुलांपासून तयार केलेला नैसर्गिक रंगाचा वापर केला जातो. इतरांमध्ये बाजारातील रंग वापरतात.
महिलांसाठी राखीव वेळ
रहाडीत रंग खेळण्यासाठी येणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक असते. जुनी तांबट लेन येथील रहडीत रंग खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी दरवर्षी दोन तासाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्या वेळेत केवळ महिला रहाड रंगोत्सवाचा आनंद घेत असतात. इतर रहाडींजवळ महिलांसाठी रंग खेळण्यासाठी वेगळी व्यवस्था करून दिली जाते. रहाडीत एका वेळेस शंभर ते सव्वाशे व्यक्ती रंग खेळत असतात.
रहाडींची पूजा केली जाते
दर वर्षी होळीच्या दुसºया दिवसापासून रहाडीचे खोदकाम काम सुरू होते. रंगपंचमीच्या आदल्या दिवसांपर्यंत स्वच्छता करून त्यात स्वच्छ पाणी भरून ठेवले जाते. ४रंगपंचमीच्या दिवशी त्यात रंग तयार करून टाकले जातात. त्यानंतर पुन्हा रहाडीची पूजा करून नागरिकांना रंग खेळण्यासाठी मोकळी करून दिली जाते.
या पेशवेकालीन रहाडीत पाणी आणि रंग मिसळून जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा होते. या रहाड संस्कृतीला खूप मोठा इतिहास असून ती वर्षानुवर्षे तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात शनी चौक, दिल्ली दरवाजा, तिवंधा चौक, तांबट अळी, जुनी तांबट आळी आणि मधली होळी अशा सहा रहाडी असून, यंदा सहाही रहाडी उघडण्यात आल्या आहेत.