कुरळपच्या आश्रमशाळा संस्थाचालकांकडून वासनाकांड ; शिक्षण क्षेत्राला काळिमा

कुरळपच्या आश्रमशाळा संस्थाचालकांकडून वासनाकांड ; शिक्षण क्षेत्राला काळिमा

कुरळप : येथील निनाई आश्रमशाळेचे संस्थापक अरविंद आबा पवार (वय 61, रा. मांगले, ता. शिराळा) याला आज शाळेतील अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात त्याच्याव पाच मुलींवर बलात्काराचा व तीन मुलींशी लैंगिक चाळे केल्याचा ठपका ठेवला असून याप्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. कुरळप पोलिसांना निनावी पत्राची गंभीर दखल घेत या प्रकरणाचा छडा लावला. नराधम पवार याला या घृणास्पद कृत्यात मदत करणाऱ्या स्वयंपाकीण मनिषा शशिकांत कांबळे या महिलेलाही (वय 45, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही वर्षांपासून आश्रमशाळांच्या गैरकारभाराचे वाभाडे निघत असताना या प्रकाराने 
शैक्षणिक क्षेत्राला पुरता काळिमा फासला गेला आहे. 

आश्रम शाळेत विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण होत असल्याचे निनावी पत्र सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांना काल मिळाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना साध्या वेशात शाळेत पाठवून पडताळणी करण्यास सांगितले. त्यांनी शाळेत जाऊन मुलींशी संवाद साधला. थोडी आपुलकी दाखवल्यानंतर मुलींनी संस्थापक पवार याचे कारनामे वाचले. आज सकाळी पोलिस उपअधीक्षक किशोर काळे यांनी गावात धाव घेत पवार याला ताब्यात घेतले. त्यानंतर जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी सुवर्णा पवार, निर्भया पथकाच्या कोमल पवार, वाळवा पंचायत समितीचे बाल प्रकल्प अधिकारी सुहास बुधावले यांच्यासह आश्रम शाळेवर छापा टाकला. पवार याच्या शाळेतील खोलीत तसेच आवारातील निवासी खोलीची झडती घेतली. संस्थेचे कार्यालय व दप्तर सील केले. त्यावेळी अश्‍लील सीडी, उत्तेजक औषधे, सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले. पोलिसांनी पीडित आठ मुलींना घेऊन त्यांच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांना या प्रकाराची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलींची वैद्यकीय तपासणी सुरु होती. 

दरम्यान, या प्रकरणाचा सुगावा गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना लागला होता. दबक्‍या आवाजात चर्चा सुरु होती. त्याच्या अत्याचाराकडे शाळेतील शिक्षकांकडून दुर्लक्ष झाले. काल निनावी पत्राने या निंदनीय कृत्याला वाचा फुटली. पवार याने मुलींना मारहाण करून लैंगिक शोषण केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. त्याने पीडित मुलींना " मी जे करतोय ते कुणाला सांगायचे नाही अन्यथा मार दिला जाईल.' अशा शब्दात धमकावल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. पवार याच्या या कारनाम्याबद्दल काही मुलींनी शिक्षकांनाही सांगितले. मात्र त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. पीडित अनेक मुलींना आईवडील नाहीत. हतबल या मुलीनी गेल्या अनेक महिन्यांपासून नराधमाचा अत्याचार सहन केला. उपनिरिक्षक पल्लवी चव्हाण यांनी याबाबाबत फिर्याद दिली आहे. या संपुर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल असे पोलिस उपाधीक्षक काळे यांनी सांगितले. 

कोण हा अरविंद पवार ? 

1990 मध्ये अरविंद पवार शिवसेनेचा शिराळा तालुका प्रमुख होता. युती शासनाच्या काळात 1996 मध्ये मिनाई आश्रम शाळेस मान्यता मिळाली. पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गात इथे साडेसहाशेंवर विद्यार्थी-विद्यार्थींनी शिकतात. बहुतांश विद्यार्थी निवासी आहेत. त्यात मुलीही आहेत. गतवर्षी इथल्या एका विद्यार्थ्याने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे ही शाळा राज्यभर चर्चेत आली. निवासी आश्रम शाळेचे प्रश्‍नही ऐरणीवर आले. मात्र प्रशासनाने या विद्यार्थ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत प्रकरण दडपले. यापुर्वी शाळेतील शिपाई संस्थापकाच्या मांगलेतील शेतात वृक्षतोड करताना मृत्यूमुखी पडला. ते प्रकरणही आर्थिक तडजोडीने दडपले. त्यानंतर शाळेचा विद्यार्थी गणेश विसर्जनच्या दरम्यान ट्रॅक्‍टरच्या चाकाखाली सापडून मयत झाला. याबाबतही फार काही झाले नाही. सारे काही पैशाने मिटवता येते असा आत्मविश्‍वासच या साऱ्या घटनांनी त्याला दिला. त्याने शाळेतील काही मुलींना मांगलेतील घरकामासाठी नेल्याची चर्चा आहे. गरीब वंचित कुटुंबातून आलेली ही सारी मुले राज्याच्या अनेक भागातून आली आहे. त्यांच्या या असह्यतेचा फायदा त्याने वेळोवेळी घेतला. 

निनावी पत्राने वाचा 

नराधम पवार याच्या या कृत्याची शाळा आवारात चर्चा होती. मात्र त्याला वाचा फुटली ती निनावी पत्राने. पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेत उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांनी साध्या वेशात शाळेत जाऊन मुलींशी संवाद साधन शहनिशा केली आणि आज शाळेवर धाड टाकत पवार याच्या गुन्हेगारी कृत्याचा पर्दाफाश केला. पवार याच्या निवासी खोलीत उत्तेजक औषधे अश्‍लिल सीडी सापल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

आरोपी मनिषाला मारहाण 

नराधम पवार याला मदत करणारी आरोपी मनिषा कांबळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिला पोलिस ठाण्यात नेताना चक्कर आली. प्राथमिक उपचारासाठी नेत असताना उपस्थित काही महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी तिला मारहाण केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com