सहमतीने शरीरसंबंध हा बलात्कार नाही 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

मुंबई - दोन सज्ञान व्यक्तींनी एकमेकांशी सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार ठरू शकत नाहीत. कारण, त्याच्या परिणामांची जाणीव त्यांना असते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. 

मुंबई - दोन सज्ञान व्यक्तींनी एकमेकांशी सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार ठरू शकत नाहीत. कारण, त्याच्या परिणामांची जाणीव त्यांना असते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. 

प्रेयसीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या युवकावरील आरोपही न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. आरोपी युवक व संबंधित महिला यांच्यामध्ये 2010 मध्ये प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच सहमतीने त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध झाले होते, असे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जेव्हा त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते तेव्हा तिचे वय 26 होते, त्यामुळे तिला आपल्या वर्तनाची पुरेशी जाणीव होती आणि शिक्षित असल्यामुळे याबाबत तिची फसवणूक झाली असे म्हणता येणार नाही, असे मत न्या. मृदुला भाटकर यांनी व्यक्त केले आहे. 

तक्रारदार तरुणीने युवकाविरोधात बलात्कार, फसवणूक, मारहाण आदी आरोप ठेवले आहेत. न्यायालयाने बलात्काराचा आरोप जरी रद्दबातल ठरविला असला तरी फसवणूक, मारहाण, गुन्हेगारी हेतू आदी आरोप कायम ठेवले आहेत. त्याविरोधात फौजदारी खटला चालणार आहे. संबंधित महिला प्राध्यापक आहे. आरोपीने तिला लग्नाचे आश्‍वासन दिले आणि फसवणूक केली; तसेच तिच्याकडून अनेकदा मारहाण करून पैसे घेतले, असे तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे.

Web Title: Rape is not sex concurrence