बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 मार्च 2019

अन्य शिक्षा देणे अयोग्य! 
हत्येपेक्षा बलात्कार हा अधिक गंभीर गुन्हा आहे. या खटल्यात दोषींना फाशीपेक्षा अन्य शिक्षा देणे अयोग्य आहे, असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला. याप्रकरणी उद्याही (शुक्रवार) युक्तिवाद सुरू राहणार आहे. 

मुंबई  - बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. खुनानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो, परंतु बलात्कारानंतर संबंधित पीडितेचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनावर झालेला आघात भरून येऊ शकत नाही. त्यामुळे बलात्कार आणि खून यांची तुलना करणे आणि गांभीर्य निश्‍चित करणे अशक्‍य आहे, असा युक्तिवाद महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी गुरुवारी राज्य सरकारच्या वतीने केला. 

बलात्कारानंतर एक प्रकारे पीडितेचा जगण्याचा अधिकारच हिरावून घेतला जातो. "नॅशनल क्राइम रेकॉर्ड'ची काही वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे समाजात कठोर संदेश जावा, या हेतूने बलात्काराच्या खटल्यांतील दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महालक्ष्मी येथील शक्ती मिल परिसरात झालेल्या सामूहिक बलात्कार खटल्यात दोषींना ठोठावलेली फाशीची शिक्षा योग्य असल्याचे समर्थन त्यांनी केले. 

बलात्कारानंतर पीडितेला प्रत्येक श्‍वास घेतेवेळी तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आठवण येत असते, हा महाधिक्‍त्यांचा युक्तिवाद ऐकताच न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. रेवती डेरे-मोहिते यांनी केईएम रुग्णालयातील परिचारिका अरुणा शानबाग यांच्यावर झालेला बलात्कार आणि त्यानंतर शानबाग यांची 40 वर्षे जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीचा उल्लेख केला. 

शक्ती मिल कंपाउंडमध्ये संध्याकाळी सहकाऱ्यासह छायाचित्रे काढण्यासाठी गेलेल्या महिला छायाचित्रकारावर पाच जणांनी बलात्कार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी विजय जाधव, कासीम बंगाली, सलीम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. या खटल्यात मुंबई सत्र न्यायालयाने सिराजला जन्मठेपेची, तर तीन आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. 

दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करत, भारतीय दंडसंहितेत कलम 376(ई) हे कलम लागू केले. शक्ती मिल बलात्कार खटल्यात हे कलम लावणे चुकीचे असल्याचे नमूद करत या मुद्द्यावर फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या तिघांच्या वतीने युग चौधरी यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे; त्याला कुंभकोणी यांनी विरोध दर्शवला. 

अन्य शिक्षा देणे अयोग्य! 
हत्येपेक्षा बलात्कार हा अधिक गंभीर गुन्हा आहे. या खटल्यात दोषींना फाशीपेक्षा अन्य शिक्षा देणे अयोग्य आहे, असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला. याप्रकरणी उद्याही (शुक्रवार) युक्तिवाद सुरू राहणार आहे. 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape is a serious crime than murder