मंत्रालयात ‘मूषकराज’

मंत्रालयात ‘मूषकराज’

मुंबई - विघ्नहर्त्याचे वाहन असलेल्या उंदरांचा सध्या मंत्रालयातील कानाकोपऱ्यांत मुक्‍त वावर सुरू आहे. मंत्र्यांच्या कार्यालयांपासून ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत या उंदीरमामांचा बोलबोला आहे. त्यामुळे एक प्रकारे मंत्रालयात उंदीरराज अवतरले आहे. दिवसाला सरासरी दहा उंदीर मंत्रालयातून पकडले जात आहेत. सहा जणांचे पथक उंदरांना पकडण्याच्या मोहिमेवर तैनात आहे.

राज्याची आर्थिक स्थिती हलाखीची झाल्याचा आरोप करताना विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर ‘तिजोरीत उंदरे फिरत आहेत’ अशी टीका करत असतो. मात्र, प्रत्यक्षात मंत्रालयाच्या इमारतीत आणि आवारातही उंदरांचे प्राबल्य आहे. 

मंत्रालयाचा सहावा मजला हे राज्याचे सत्ताकेंद्र आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालय आहे. उंदरांनी या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाचा ताबा घेतला आहे. 

मुख्यमंत्री कार्यालय हैराण 
मुख्यमंत्री कार्यालयातील बैठकांना हे उंदीर महाशय खुशाल ‘हजेरी’ लावून लगबग करत असतात. त्यांना मुख्यमंत्र्यांची अथवा मुख्यमंत्री कार्यालयातील वजनदार प्रशासकीय अधिकाऱ्यांची भीती वाटत नाही. त्यांचा अगदी बिनधास्त वावर सुरू असतो. यामुळे मुख्यमंत्री कार्यालय हैराण झाले आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयानंतर काही उंदीरमामांनी मंत्र्यांच्या कार्यालयात आपले बस्तान हलविले आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सांवत यांच्या कार्यालयात घुसखोरी करून उंदरांनी सांवत यांच्या कार्यालयाचे ‘आरोग्य’ धोक्‍यात आणले आहे. 

उंदरांसाठी भजी, जिलेबी अन्‌ बिस्किटे
सहाव्या मजल्याचा ताबा घेतल्यानंतर उंदरांनी प्रत्येक मजल्यावरील मंत्र्यांच्या कार्यालयात शिरकाव केला आहे. यामुळे मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाला गंभीर दखल घ्यावी लागली आहे. उंदीर पकडण्यासाठी सहा जणांचे पथक तयार केले असून, ते या मोहिमेवर दिवसरात्र कार्यरत आहे. प्रत्येक मजल्यावरील मंत्री कार्यालयांत हे पिंजरे ठेवले जातात. यात कांदाभजी, बटाटे भजी, जिलेबी, बिस्किटे उंदरांना आकर्षित करण्यासाठी ठेवण्यात येतात. सायंकाळी पाच वाजता हे पिंजरे कार्यालयात ठेवले जातात. सकाळी ते तपासले जातात. दिवसाला सरासरी दहा उंदीर या पिंजऱ्यांत सापडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com