शिधापत्रिकेवर लोहयुक्त मीठ 

शिधापत्रिकेवर लोहयुक्त मीठ 

मुंबई - राज्यभरातील बालके, स्त्रिया, तसेच पुरुष यांच्या रक्‍तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याचा धक्‍कादायक अहवाल आल्यानंतर लोहयुक्‍त मिठाचे शिधापत्रिकेवरून वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुणे व नागपूर या शहरांत प्रायोगिक तत्त्वावर शिधापत्रिकेवरून मीठ दिले जाणार आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाने टाटा ट्रस्टशी करार केला आहे. रक्‍तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी लोहयुक्‍त मीठ उपयोगी पडते. 

देशात तसेच राज्यात ऍनिमियाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे सिद्ध झाले आहे. चौथ्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार राज्यात मुलांमध्ये (वय 6 महिने ते 5 वर्षे) 53.8 टक्‍के, तसेच 15 ते 49 वर्षे वयाच्या महिलांमध्ये 48 टक्‍के इतक्‍या मोठ्या प्रमाणात रक्‍तामध्ये हिमोग्लोबिनचे (ऍनिमिया) प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. पुरेशा प्रमाणात आहारातून लोहयुक्‍त मीठ आणि इतर पोषकद्रव्ये दिल्यास ऍनिमिया नियंत्रणात आणता येतो. सध्या लोहयुक्‍त गोळ्या देऊन ऍनिमिया आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आणखी व्यापक पुरवठा करण्यासाठी सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून लोह व आयोडिनयुक्‍त मीठ वितरित करण्याचा निर्णय टाटा ट्रस्टच्या सहकार्याने घेतला आहे. पुणे व नागपूर येथे पहिल्यांदा शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमार्फत लोहयुक्त मीठ वितरित करण्यात येणार आहे. सध्या आयोडिनयुक्‍त मीठ आहारात वापरले जाते. लोहयुक्‍त मिठाची उपलब्धता अत्यंत कमी आहे. 

यापूर्वी 24 जानेवारी 1992 मध्ये आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रांत, अवर्षणप्रवण क्षेत्रांत आयोडिनयुक्‍त मीठ शिधापत्रिकेवरून वितरित केले जात होते. त्यानंतर राज्यभर साध्या मिठावर बंदी आल्यानंतर आणि आयोडिनयुक्‍त मिठाची उपलब्धता वाढवल्यावर ही योजना आपोआप बंद पडली. झारखंड, मध्य प्रदेश या राज्यांत लोहयुक्‍त मीठ सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित केले जाते. प्रतिकिलो 14 रुपये इतक्‍या दराने 1 जुलैपासून हे मीठ मागणीनुसार उपलब्ध होणार आहे. 

सर्वसाधारण 25 टक्‍के पुरुष, 55 टक्‍के स्त्रिया आणि 73 टक्‍के मुले यांच्यात लोहाची कमतरता असल्याचे सर्वेक्षण सांगते. यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती कमी होते. वाढ खुंटते. लोहयुक्‍त, आयोडिनयुक्‍त मीठ रोजच्या आहारात वापरले, तर 50 ते 60 टक्‍के कमतरता कमी होण्यास मदत होते. यामुळे लोहयुक्‍त मिठाचा पुरवठा होणे ही चांगली बाब आहे. 
- डॉ. सचिन तेंडुलकर, आहारतज्ज्ञ आणि वैद्यकीय सल्लागार 

शिधापत्रिकाधारकांची संख्या 
- पुणे जिल्ह्यातील शिधापत्रिका लाभार्थी - 8 लाख 66 हजार 260 
- नागपूर जिल्ह्यातील शिधापत्रिका लाभार्थी - 2 लाख 74 हजार 889 
- राज्यातील एकूण लाभार्थी - 2 कोटी 37 लाख 10 हजार 666 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com