रेशन धान्यवाटप प्रक्रिया आता ऑनलाइन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 मार्च 2017

अन्न नागरी पुरवठा विभागाची कॅशलेसच्या दिशेने वाटचाल

अन्न नागरी पुरवठा विभागाची कॅशलेसच्या दिशेने वाटचाल
मुंबई - रेशन दुकानदारांना धान्याची उचल करणे सुलभ व्हावे यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने ही प्रक्रिया ऑनलाइन करून महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे रेशन दुकानदारांची तालुका कार्यालयातील फेऱ्या कमी होणार असून, वेळ व पैशांची बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच या सुविधेमुळे संपूर्ण प्रक्रिया रोखरहित होणार असून, मानवी हस्तक्षेप कमी होऊन गैरप्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होणार आहे. रेशन दुकानांमध्ये वेळेवर धान्य उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार रेशन दुकानदारांच्या धान्याची उचल करण्यासाठी चलन भरणे, ते संबंधित तहसील अथवा परिमंडळ कार्यालयात जाऊन तपासून घेणे, त्यानंतर ते चलन घेऊन बॅंकेत जाऊन रोख रक्कम भरणे आणि पैसे भरलेले चलन परत संबंधित कार्यालयात जमा करून त्यांच्याकडून धान्य उचल पावती घेणे या कामांसाठी किमान तीन ते चार फेऱ्या होतात. तसेच आपल्याला किती धान्यवाटप होणार आहे, त्याचे किती पैसे भरावे लागणार आहेत, याची माहिती घेण्यासाठीही संबंधित कार्यालयात वारंवार पाठपुरावा करावा लागतो. आता ही सर्व प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. रेशन दुकानदारांना रेशनचे धान्य मिळविण्यासाठी आणि त्याची रक्कम भरण्यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने धान्यवाटप व पैसे भरण्याची सुविधा "गव्हर्नमेंट रेव्हेन्यू ऑडिट सिस्टीम' (जीआरएएस) प्रणालीद्वारे ऑनलाइन केली आहे.

त्यामुळे दुकानदारांना आपल्याला वाटप झालेल्या धान्याची  त्यासाठीच्या रकमेची माहिती एका क्‍लिकवर मिळणार आहे. धान्याची रक्कम भरण्याची सुविधा ऑनलाइन दिल्यामुळे दुकानदारांना आता चलन घेऊन बॅंकेत जाण्याची व पुन्हा ते चलन संबंधित कार्यालयात नेऊन देण्याची गरज भासणार नाही. तसेच आपल्याला वाटप झालेल्या धान्याची रक्कम कधीही भरता येणार असल्यामुळे दुकानदारांची सोय झाली आहे. दुकानदारांकडील बॅंकेत जमा झालेली रक्कम सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर सरकारच्या तिजोरीत जमा होत होती. त्यामुळे त्यास विलंब लागत होता. मात्र आता ऑनलाइन सुविधेमुळे धान्याचे पैसे थेट सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहेत. पैसे भरल्याची पावती मिळाल्यानंतर थेट गोदामात जाऊन धान्य घेता येत असल्यामुळे दुकानदारांचे संबंधित कार्यालयातील हेलपाटे वाचणार आहेत.

अशी असेल ऑनलाइन प्रक्रिया
- दुकानदारांना "जीआरएएस' प्रणालीवर नोंदणी करून माहिती भरावी लागणार. नोंदणी न करताही रक्कम जमा करण्याची सोय उपलब्ध
- एकदा नोंदणी केल्यास प्रत्येकवेळी माहिती भरण्याची आवश्‍यकता राहणार नाही
- या प्रणालीद्वारे रक्कम भरल्यानंतर त्याच्या चलनाची व त्या व्यवहाराची माहिती पाहता येणार
- रक्कम भरण्यासाठी नेट बॅंकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड यांचा वापर करता येणार
- नेट बॅंकिगची सुविधा नसलेल्या दुकानदारांसाठी पेमेंट ऍक्रॉस बॅंक काउंटरची सुविधा उपलब्ध. त्याद्वारे बॅंकेत जाऊन पैसे भरता येणार
- रक्कम भरल्यानंतर चलनाचा "गव्हर्नमेंट रेफरन्स नंबर' (जीआरएन) पुरवठा शाखेस प्रत्यक्ष, दूरध्वनी, एसएमएस, ई-मेल अथवा इतर माध्यमांद्वारे उपलब्ध करून द्यावे लागणार

Web Title: ration grain distribution process online