52 वर्षांनंतरही कोयनेतील 'त्या' भूकंपाच्या कारणाचे गूढ कायम!

टीम ईसकाळ
बुधवार, 11 डिसेंबर 2019

भूंकपशास्त्र हर्ष गुप्ता यांच्यामते भूकंप कसे होतात याचा अभ्यास करण्यासाठी कोयना हे जगातील सर्वांत उत्तम ठिकाण आहे. 300 फूट उंच आणि 800 फूट लांब असलेलं हे धरण बांधण्यापूर्वी या ठिकाणी एकही भूकंप झाला नव्हता.

कऱ्हाड : कोयनेच्या परिसरात 11 डिसेंबर 1967ला 7.5 रिश्‍टर स्केलचा भूकंप झाला होता. या आज घटनेला 52 वर्षे पूर्ण झाली, तरी भूकंपाने झालेल्या जखमा आजही ताज्या आहेत. भूकंप पुनर्वसनाचा निधी सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यत पोहोचलेला नाही. भूकंपग्रस्तांच्या वेदना अजूनही शासनदरबारी मांडल्या जात नाहीत, अशीच येथील ग्रामस्थांची व्यथा आहे. आज 52 वर्षांनंतरही कोयनेचा भूकंप नक्की कशामुळे झाला याचे कारण अस्पष्ट आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

या घटनेला 52 वर्षे पूर्ण झाली. भूकंपाचा तो दिवस आजही काळा दिवस म्हणून ओळखला जातो. या संकटानंतर चिपळूण तालुक्‍याचा भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून शासनदरबारी नोंद झाली. भूकंपबाधित ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला. रत्नागिरी, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही गावांच्या पुनर्वसनासाठी दरवर्षी ठराविक निधीची तरतूद करण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला.

Image result for koynanagar earthquake

भेलसई (ता. खेड) येथील रहिवासी असलेल्या शांताराम कदम यांनी 2016मध्ये दिलेल्या माहितीनुसार 11 डिसेंबर 1967 मध्ये झालेल्या भूकंपामुळे या तालुक्‍यात फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. शासनदरबारी नोंद असलेल्या आकडेवारीनुसार या भूकंपात 185 जणांचा मृत्यू होऊन परिसरातील 60 गावांतील 40 हजार 499 घरे आणि पायाभूत सुविधा पूर्णतः उद्‌ध्वस्त झाल्या होत्या. 936 पशुधन प्राणाला मुकले होते. जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली होती. 

भूंकपशास्त्र हर्ष गुप्ता यांच्यामते भूकंप कसे होतात याचा अभ्यास करण्यासाठी कोयना हे जगातील सर्वांत उत्तम ठिकाण आहे. 300 फूट उंच आणि 800 फूट लांब असलेलं हे धरण बांधण्यापूर्वी या ठिकाणी एकही भूकंप झाला नव्हता. जगभरात ट्रीगर झालेल्या भूकंपाच्या 120 घटना घडल्या आहेत. त्यातील केवळ चार भूकंप हेच 6 रिश्टर क्षमतेपेक्षा जास्त होते. त्यामध्ये झाम्बिया- झिंबाब्वे सीमेवरील करिबा (1963), चीनमधील झिंगफेनकिंग (1961), ग्रीसमधील केमत्सा (1966) आणि कोयना (1967) यांचा समावेश आहे. कोयना भूकंपामुळे जवळपास 30 किमीवरील परिसराला धक्का बसला होता. 

Image result for photos of  koynanagar earthquake 1967

कोयनेच्या परिसरात होणाऱ्या भूकंपाचे धक्के चिपळूण, खेड, देवरूख आणि संगमेश्‍वरच्या काही भागाला बसतात. या परिसरातील भूकंपला काहीजण कोयना धरण जबाबदार धरतात. धरण आणि जलाशय यांच्यामुळे भूकंप होतात हा अजूनही वादाचा मुद्दा आहे. जगभरात मोठ्या धरणांपैकी फक्त दोन ते तीन टक्के धरणांच्या अगदी जवळच्या परिसरात भूकंप जाणवतात आणि ते फक्त दोन ते तीन रिश्टर क्षमतेचेच असतात. 1967मध्ये झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून जवळपास 13 किमी लांब होता आणि त्याची खोली 12 किमी होती तर कोयना जलाशयाची खोली केवळ 80 मीटर आहे. 

आंतरराष्ट्रीय महाद्विपीय वैज्ञानिक ड्रिलिंग कार्यक्रमांतर्गत परेदशातील 30 तर देशातील 50 शास्त्रज्ञांचा गट 2011पासून या भूकंपाचे खरे कारण शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reason of koynanagar earthquake 1967 after 52 years