बंडखोर आमदार? आम्ही नाही पाहिले!

Congress-and-Janata-Dal
Congress-and-Janata-Dal

मुंबई - कर्नाटकातील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) दहा बंडखोर आमदारांनी सध्या मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात तळ ठोकला आहे. सध्या भाजप नेते आणि या आमदारांच्या भेटीगाठी सुरू असताना महाराष्ट्र प्रदेश भाजपने मात्र हे आमदार येथे आल्याचे आम्हाला माहितीच नसल्याचा अजब दावा केला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी कर्नाटकातील लोकशाही मार्गाने निवडून आलेले ‘काँग्रेस- जेडीएस’ आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकातील तेरा बंडखोर आमदारांनी त्यांचे राजीनामे विधान सभाध्यक्षांच्या कार्यालयाकडे सुपूर्त केले असून, यातील दहा आमदार शनिवारी रात्रीच विशेष विमानाने मुंबईमध्ये आले होते. याबाबत माध्यमांनी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनीही कर्नाटकातील आमदार येथे आल्याचे आम्हाला माहितीच नसल्याचा दावा केला.

विशेष म्हणजे आज कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार महेंद्र सिंघी आणि भाजपचे नेते प्रसाद लाड एका पंचतारांकित हॉटेलाबाहेर एकत्र आढळून आले होते. यावर सिंघी यांनी सरकारला काहीही धोका नसल्याचा दावा करत मुख्यमंत्री आल्यानंतर सर्व वाद मिटतील, असे स्पष्ट केले. लाड यांनी मात्र या भेटीबाबत मौन बाळगणे पसंत केले. त्यामुळे संशय आणखी वाढला आहे.

‘ते’ विमान भाजप खासदाराचे
कर्नाटकमधील दहा बंडखोर आमदारांना मुंबईला घेऊन येणारे विशेष विमान हे भाजपचे राज्यसभा खासदार राजीव चंद्रशेखर यांच्याशी संबंधित कंपनीच्या मालकीचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ते विमान ‘ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या मालकीचे असून, चंद्रशेखरच हे या कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. हे विमान दैनंदिन वाहतुकीसाठी वापरले जाते. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांना हे विमान उपलब्ध करून देतो, असा दावा कंपनीच्या अधिकाऱ्याने केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com