साहित्य संमेलनाध्यक्षांची होणार निवड, घटनादुरुस्तीला मान्यता

नितीन नायगांवकर
रविवार, 1 जुलै 2018

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीऐवजी सन्मानपूर्वक निवड करण्याच्या घटना दुरुस्तीला महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता नाट्य संमेलनाच्या धरतीवर अध्यक्ष निवडले जातील. या प्रस्तावाला घटक संस्थांच्या मान्यतेची औपचारिकताच तेवढी शिल्लक असून 2020 मध्ये होणाऱ्या 93 व्या संमेलनात हा ऐतिहासिक निर्णय लागू होणार आहे. 

निवडणुक प्रक्रियेमुळे अनेक दिग्गज साहित्यिक अध्यक्षपदाच्या शर्यतीपासून लांब होते. निवडणुकीचा वाढता खर्च, संपर्कासाठी द्यावा लागणारा वेळ, प्रवास या बाबींमुळे अध्यक्षपद निवडणुकीऐवजी सन्मानाने बहाल करण्यात यावे, अशी अपेक्षा अनेक वर्षांपासून व्यक्त होत होती. महामंडळ नागपूरला आल्यावर विदर्भ साहित्य संघानेच सर्वप्रथम घटना दुरुस्तीचा प्रस्ताव समितीकडे पाठविला, असे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. सर्व घटक संस्था प्रत्येकी तीन नावे, तर समाविष्ट, संलग्न आणि सहयोगी संस्था प्रत्येकी एक नाव अध्यक्षपदासाठी सुचवतील. यापैकी एका नावावर महामंडळ शिक्कामोर्तब करेल. 

पुढील संमेलन विदर्भातच 

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदासाठी सातारा, अमरावती, वाशिम, अळमनेर, नायगाव बाजार नांदेड, तळोधी चंद्रपूर, जबलपूर, वर्धा आणि यवतमाळ असे नऊ प्रस्ताव महामंडळाकडे आले होते. यापैकी अळमनेर, सातारा व अमरावतीने प्रस्ताव मागे घेतले तर नांदेडचा विचार करू नये असे मराठवाड्याच्या प्रतिनिधीने स्पष्ट केले. उर्वरित पाच स्थळांपैकी वर्धा आणि यवतमाळचे प्रस्ताव स्थळ निवड समितीसाठी विचारात घेण्यात आले आहेत. या स्थळांना भेट देऊन यापैकी एकाचे नाव यजमानपदासाठी निश्‍चित करण्यात येईल. त्यामुळे 92वे साहित्य संमेलन विदर्भातच होईल, हे स्पष्ट झाले आहे. वर्धेला 1969 नंतर तर यवतमाळला 1973 नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेले नाही, हे विशेष. पत्रकार परिषदेला डॉ. विलास चिंतामण देशपांडे आणि डॉ. इंद्रजित ओरके उपस्थित होते.

Web Title: Recognition of the constitution of the meeting of the committee, the constitutional approval