मंत्र्यांनी हटवला "लाल दिवा'..!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 एप्रिल 2017

केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी; मुख्यमंत्र्यांनी काढला दिवा

केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी; मुख्यमंत्र्यांनी काढला दिवा
मुंबई - 'साहेबांना लाल दिवा मिळणार.. साहेबांची लाल दिव्याची गाडी...' असं म्हणत कार्यकर्ते आपल्या लाडक्‍या नेत्याच्या मंत्रिपदाचा गौरव करत असले तरी, आता हे लाल दिवे इतिहासजमा होणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंत्र्यांच्या गाडीवरील लाल दिवे काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज याची तडकाफडकी अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची माहिती मिळताच प्रवासात असतानाच गाडीवरचा लाल दिवा काढून टाकला. प्रत्यक्षात 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असली तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा निर्णय तत्काळ अंमलात आणला. व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या या महत्त्वाच्या निर्णयाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करीत असून, आपण शासकीय वाहनावर लाल दिवा लावणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून त्याची पुणे दौऱ्यात तात्काळ अंमलबजावणीही केली. या निर्णयामुळे लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे, अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर या निर्णयाची माहिती कळाल्याने तिथेच गाडीवरचा लाल दिवा काढून टाकला.

Web Title: red lamp release by minister