‘शासन आपल्या दारी’मुळे लाचखोरीत घट! सरकारी कार्यालयात न जाता सर्वसामान्यांना एकाच ठिकाणी कागदपत्रे अन् योजनांचा लाभ

‘शासन आपल्या दारी’ या महत्वकांक्षी उपक्रमामुळे राज्यातील लाच घेण्याचे प्रमाण कमी झाले असून १ जून ते २७ ऑगस्टपर्यंत मागील दोन वर्षांच्या तुलनेत ७ ते ३२ गुन्हे कमी झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dariesakal

सोलापूर : शासकीय योजनांचे लाभ एकाच छताखाली मिळावेत, यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून ‘शासन आपल्या दारी’ अभियान हाती घेतले. प्रत्येक जिल्ह्यातील किमान ७५ हजार गरजूंना त्यातून लाभ मिळणार असल्याने लाभार्थींना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे राज्यातील लाच घेण्याचे प्रमाण कमी झाले असून १ जून ते २७ ऑगस्टपर्यंत मागील दोन वर्षांच्या तुलनेत ७ ते ३२ गुन्हे कमी झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

शासकीय नोकरी आणि लाखो रुपयांची पगार असतानाही दरवर्षी ७०० ते ८५० लोक लाच प्रकरणात अडकतात, अशी काही वर्षांची स्थिती आहे. त्यात महसूल व पोलिस विभाग अव्वल आहे. शासकीय कार्यालयांना सेवा हमी कायदा लागू असतानाही सर्वसामान्यांना त्यांचे अधिकार माहीत नसल्याने योजनांचा लाभ किंवा कागदपत्रांसाठी त्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यातूनच लाच घेणे व देण्याचे प्रकार वाढतात, असे निरीक्षण नोंदविण्यात आले.

या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला. हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात यशस्वी व्हावे म्हणून १६ हजार योजना दूत नेमले असून मुख्यमंत्री सचिवालयाचे त्यावर नियंत्रण आहे. ‘महालाभार्थी’ पोर्टलवर नोंदणी करून नागरिकांना अनेक योजनांचा लाभ तालुक्याच्या ठिकाणी एकाच छताखाली दिला जात आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे मागील तीन महिन्यात लाचेचे गुन्हे घटले आहेत.

कार्यालयाचे उंबरठे झिजवणे बंद

राज्यातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांच्या लाभासाठी किंवा अर्जासाठी इतर कागदपत्रे आणि दाखले मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यातूनच पैशांची (लाच) मागणी केली जाते. या सर्व गोष्टीतून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणूनच ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या अभियानाअंतर्गत नागरिकांना एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता देखील जागेवरच करून दिली जात आहे.

तुलनात्मक लाच प्रकरणे (जून ते ऑगस्ट)

वर्ष लाचेचे गुन्हे संशयित आरोपी

२०२१ २१७ ३०९

२०२२ १९२ २७५

२०२३ १८५ २५९

यंदा घट ७ ते ३२ १६ ते ५०

१०६४ वर तक्रारी करावी; निश्चित कारवाई

ज्या शासकीय कार्यालयाशी लोकांचा थेट संबंध येतो, त्याठिकाणी लाचेचे प्रकार सर्वाधिक घडतात. पण, आता लोक जागरूक झाले असून पैशांची मागणी होत असल्यास थेट तक्रारी करीत आहेत. १०६४ या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधून तक्रारी करतात. त्यानुसार सापळा रचून कारवाई केली जाते.

- गणेश कुंभार, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com