सकट कुटुंबांचे पुण्यात पुनर्वसन - आठवले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

कोरेगाव भीमा -  कोरेगाव भीमाजवळील (ता. शिरूर) वाडा पुनर्वसन गावठाण येथील पूजा सकट मृत्यूप्रकरणी खुनाचा संशय व्यक्त करून संबंधित आरोपींना अटक करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. त्याचबरोबर  सकट कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत व त्यांचे पुण्यात पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

मंत्री आठवले यांच्यासह रिपब्लिकन पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आज वाडा पुनर्वसन येथे सकट कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे, बाळासाहेब जानराव, हनुमंत साठे, शैलेंद्र चव्हाण, अशोक शीलवंत, संजय सोनवणे, शिरूर तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे;तसेच पुजाचे वडील सुरेश सकट, भाऊ जयदीप सकट, चुलते व बहुजन लोक अभियानचे महासचिव वसंतराव सकट, नगर जिल्हा काँग्रेसचे दिलीपराव सकट, तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी उपस्थित होते.      

या वेळी आठवले यांनी सकट कुटुंबाची विचारपूस करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सकट कुटुंबास पूर्ण संरक्षण, त्यांचे घर जळाल्यामुळे विशेष बाब म्हणून पुण्यात पुनर्वसन, समाजकल्याण विभाग; तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्या अनुषंगाने समाजकल्याण विभाग, जिल्हा पोलिस अधीक्षक, तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी सूचना दिल्या. 

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सकट कुटुंबाला एक लाखाची मदत दिल्याचे त्यांनी नमूद केले. 

पूजा सकट हिचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून शवविच्छेदन अहवालानुसार संबंधित आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी करून पूजाच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आठवले यांनी या वेळी दिली.

Web Title: Rehabilitation of sakat families in Pune - Athawale