काळ्या बाहुल्यांच्या करणी-पाशातून झाडांची मुक्तता

स्वप्नील जोगी
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

अंधश्रद्धेची "इडा पिडा' टळली; "अंनिस'ने राबवली जागृती मोहीम

अंधश्रद्धेची "इडा पिडा' टळली; "अंनिस'ने राबवली जागृती मोहीम
पुणे - किती प्रदीर्घ काळापासून "त्यांच्या' खोडांवर ते काळेकभिन्न टोकदार खिळे अन्‌ मोठ्ठे दाभण ठोकले जात असतील... किर्रर्र काळोखाच्या अशा किती रात्री गेल्या असतील; जेव्हा विकृत करणीचे मंत्र उच्चारून त्या खिळ्यांसोबत त्यांच्या खोडांवर बटबटीत डोळ्यांच्या, टाचण्या टोचलेल्या काळ्या बाहुल्या लटकवल्या गेल्या असतील... न जाणो किती जणांच्या अंधश्रद्धांना याच बाहुल्यांनी अन्‌ त्यांच्यासोबत चिकटवलेल्या चिठ्ठ्यांनी वर्षानुवर्षे खतपाणी घातले असेल...

पण प्रत्येक गोष्टीची वेळ येते असं म्हणतात, तसंच आजही घडलं. अंधश्रद्धेची "इडा पिडा' दूर सारत पुण्यातील ती चार झाडं काळ्या बाहुल्यांच्या पाशातून आज मुक्त झाली. अनेक वर्षांनी त्या झाडांनी मोकळा श्‍वास घेतला...

"पुरोगामी' अशी ओळख मानणाऱ्या पुणे शहराच्या उत्तर भागातील होळकर पुलाजवळ म्हसोबाचे जुने देवस्थान आहे. त्याच्या बाजूने, नदीच्या काठाने पुढे गेल्यावर ही चार झाडे नजरेला पडायची. इतर झाडांसारखीच... पण करणीसाठी बाबा-बुवा-मांत्रिकांकडून लटकवलेल्या काळ्या बाहुल्या अंगभर घेऊन लगडलेली. ते पाहून येणाऱ्या-जाणाऱ्याच्या छातीत धस्स! झाले पाहिजे.

करणीबाबत लोकांच्या मनातील भीती हेरून या परिसरात कित्येक भोंदू बाबांचे धंदे अनेक वर्षे सुरू होते. कुणाचे लग्न होत नाही, कुणाला मूल होत नाही, कुणाला एखाद्याचा काटा काढायचाय, एखाद्याला संपत्तीचा हव्यास, कुणाला भुताची बाधा उतरवायचीय, तर कुणाला आणखी काही स्वार्थ. या सगळ्यावर अंधश्रद्धेचं पांघरूण टाकत करणी केलेल्या काळ्या बाहुल्या झाडांवर लावून "सब मर्ज की एक दवॉं' देण्याचा गोरखधंदा सुरू होता. बाहुल्यांसोबत अनेक व्यक्तिंची छायाचित्र, त्यांच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठ्या, मंत्र असंही त्यात होतं. मात्र, अशा अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) नजरेतून हा प्रकार सुटला नाही.

माणसांसोबत आता निश्‍चल झाडांनाही जेव्हा अंधश्रद्धेपोटी असा विकृत त्रास दिला जातोय, हे लक्षात आले; तेव्हा पोलिसांच्या मदतीने धडक कारवाईची मोहीम समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. 20) सायंकाळी पार पाडली. एकेका झाडावरील शेकडो बाहुल्या उपसून काढत त्यांनी या जखमी, अर्धवट जळालेल्या झाडांना मुक्त केले.

एक बाहुली सहा हजारांची
अमावस्या-पौर्णिमेच्या रात्री करणी करणे, करणी उतरवून देणे, आजार बरा करणे, भुताची बाधा उतरवणे अशा अनेक गोष्टींसाठी भोळ्याभाबड्या गरीब लोकांकडून हजारो रुपयांची लूट या ठिकाणी चालली असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. करणी उतरवण्याच्या एका बाहुलीसाठी सहा ते दहा हजार रुपयांपर्यंत पैसे उकळले जात होते. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले लोक या भोंदुगिरीला फशी पडत होते.

जादूटोण्यासाठी झाडांना खिळे ठोकून जखमी करणे हे गुन्हेगारीचेच कृत्य आहे. असंख्य खिळे अंगावर झेललेली ही झाडे पुढे कुजत जाऊन मरतात. अंधश्रद्धा पसरवण्याएवढेच हे पर्यावरणाचा नाश करण्याचे हे कृत्य आहे. हे प्रकार थांबायलाच हवेत. खडकी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केले. परंतु, या ठिकाणी लवकरच सुरक्षा वाढवणे, तसेच हा परिसर वावरण्यास सुरक्षित असल्याचे फलक लावणे आवश्‍यक आहे. त्यासाठीही पोलिसांची सहकार्य अपेक्षित आहे.
- नंदिनी जाधव (जिल्हा कार्याध्यक्ष, अंनिस)

Web Title: The release of trees from the black-eyed arms and pins