उत्पन्नवाढीसाठी एसटी करणार प्रासंगिक करार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

काय आहेत उपाययोजना

  • विभागीय पातळीवर अधिकारी व पर्यवेक्षकांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक
  • शैक्षणिक सहलींबाबत उपाययोजना
  • कोणतेही मार्ग बंद राहणार नाहीत
  • विविध संस्थांशी संपर्क साधणार
  • लग्न, यात्रा, धार्मिक स्थळांनाही प्राधान्य

पुणे - एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी लग्न, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहलींसाठी प्रासंगिक करारावर एसटी बस देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळ विभागीय पातळीवर अधिकारी व पर्यवेक्षकांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करणार आहे. तसेच, प्रत्येक आगाराला प्रासंगिक कराराचे उद्दिष्ट देणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाचा महसुलाचा प्रमुख स्रोत तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न आहे; पण त्याचबरोबर प्रासंगिक करार, जाहिराती, गाळे भाडेतत्त्वावर देणे अशा विविध मार्गांनीही महसूल मिळतो. मागील काही वर्षांपर्यंत लग्नकार्य, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहलींसाठी प्रामुख्याने एसटीला प्राधान्य दिले जात होते. यातून एसटीला मोठा महसूल मिळायचा; पण शाळांच्या सहलीसाठी एसटीच्या गाड्या देण्यासाठी अनेक अटी घातल्या होत्या, त्यामुळे महसुलात घट झाली. त्यामुळे एसटीने पुन्हा प्रासंगिक करारावर भर देत उत्पन्न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रशासनाने विभागीय स्तरावर मागील आर्थिक वर्षात झालेल्या प्रासंगिक कराराचा आढावा घेऊन ज्या शैक्षणिक संस्थांनी यापूर्वी प्रासंगिक करारावर एसटी बस घेतली होती, अशा संस्थांशी संपर्क साधून बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रासंगिक करारावर बस उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही मार्ग बंद राहणार नाहीत, तसेच कामासाठी अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतही महामंडळाने विभागीय अधिकाऱ्यांना कळविले आहे.

दरवर्षी प्रासंगिक करारावर बस दिल्या जातात. शिक्षण मंडळाने जाचक अटी घातल्याने शाळांच्या सहलींसाठी बस देताना अडचण झाली होती. यंदा त्या संदर्भातील उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.
- यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relevant agreement to ST for growth