
Sambhaji Maharaj : संभाजी महाराजांची धार्मिक नीति कशी होती ?
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्यावर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे वर्चस्व होते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पुढील अनेक वर्षे मराठा साम्राज्य सुरक्षित राहिले.
११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली. मात्र मृत्यूनंतरही संभाजी महाराजांची उदार धार्मिक लोकनीति इतिहासकारांच्या चर्चेत राहिली. हेही वाचा - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
संभाजींनी आपल्या वडिलांचे धार्मिक धोरण पुढे चालू ठेवून अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरूष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या. राजांनी पुण्याच्या विनायक उमाजी या देशाधिकाऱ्याला पत्र पाठवून संत तुकारामांचा मुलगा महादोबा याला वर्षासन दिले.
पाटगावी मौनी गोसावी हे ईश्वरपुरूष होते. संभाजींनी कुडाळ प्रांतात देशाधिकारी गणीराम याला गोसाव्यासाठी त्याचा शिष्य तुरूतगिरी यास १२५ होन देण्याची आज्ञा दिली. त्यांतील वाजंत्रीसाठी २५ आणि भोयांसाठी १०० होन होते.
पुणे शहरातील तर्फ निरथडी येथे कन्हेरी मठात वासुदेव गोसावी राहात होते. त्यांना जिराईत ९ रूके, पुष्पवाटिकेस मांढरदेवीतील ४ बिघे आणि जावळीपैकी ९ बिघे जमीन देण्याचा वाईच्या देशाधिकाऱ्याला हुकूम दिला.
कऱ्हाडचे वेदशास्त्री नरसीभट शेषभट मुंज्येमणी, कांदळगावचे अनंत भट, महादेव भट यांना प्रतिवर्षी जोंधळे व तांदूळ देण्याची आज्ञा केली. तसेच महाबळेश्वरचे वेदमूर्ती राम भट यांचे वर्षासन पूर्ववत करून त्यांना संभाजींनी रोख रक्कम व काही जिन्नस दिले.
कऱ्हाडचे शिवभट नीलकंठभट अग्निहोत्री, पावसचे हरिभट पटवर्धन, रामचंद्र केशवभट पंडित, निंब येथील सदानंद मठाचे अनंतगिरी गोसावी यांना वर्षासनाच्या सनदा दिल्या.
याप्रमाणे संभाजीराजांनी चिंचवड, मोरगाव, सज्जनगड, चाफळ, शिंगणवाडी, महाबळेश्वर इ. देवस्थानांची व्यवस्था नीट चालावी म्हणून पूर्वीची वृत्ती, इनामे व सनदा पूर्ववत चालू ठेवल्या. एकूण धार्मिक कारभाराकडे ते जातीने लक्ष घालत असत, हे तत्कालीन पत्रव्यवहारांतून दिसते.
याशिवाय त्यांनी रामदासी मठांच्या व्यवस्थेत बारकाईने लक्ष घातले होते. त्यावरून रामदासस्वामी व त्यांचे शिष्यगण यांविषयीचा त्यांचा आदरभाव दिसतो. त्यांनी सातारा, चाफळ, सज्जनगड, कराड येथील अधिकाऱ्यांना आज्ञा करून श्रीरामाच्या उत्सवाच्या व्यवस्थेसंबंधी पत्रे पाठविली होती.
स्वत:च्या धर्माचा अभिमान बाळगताना इतर धर्मांचा आदर बाळगण्याची वृत्ती शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजांमध्येही होती हेच यावरून दिसून येते.