esakal | स्मरण : कर्तृत्वाचा इतिहास घडला, वेटरचा आमदार झाला 
sakal

बोलून बातमी शोधा

hanumant dolas

त्यांचा जन्म झाला आणि अवघ्या तीन महिन्यातच त्यांची आई देवाघरी गेली. आईचे छत्र हरवल्यानंतर त्यांनी गावात प्राथमिक शिक्षण व पंढरपुरात माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर माळशिरस तालुक्‍यातील दसूर गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास मुंबईपर्यंत आणि मुंबईतून पुन्हा आपल्या गावाचा, आपल्या तालुक्‍याचा आमदार इथपर्यंत झाला. चित्रपटाला शोभावे अशीच त्यांची कथा आहे. स्वप्नपूर्तीसाठी सर्वसामान्यांना कष्टाची जिद्द करणारी ही संघर्षगाथा आहे माळशिरसचे (जि. सोलापूर) आमदार कै. हनुमंत डोळस यांची. बोरिवली येथील हॉटेलमधील वेटरपासून ते माळशिरसच्या आमदारकीपर्यंतचा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. 

स्मरण : कर्तृत्वाचा इतिहास घडला, वेटरचा आमदार झाला 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

पंढरपुरातील विवेक वर्धिनीमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. नाईट कॉलेजमध्ये अकरावी, बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बोरिवली रेल्वे स्थानकावर दिवसा बुटपॉलिशचे काम आणि रात्री शिक्षण असाच त्यांचा नित्यक्रम होता. 1982 मध्ये त्यांनी मुंबई विमानतळ शेजारील सेंटर हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरीला सुरवात केली. वेटरवरुन त्यांना मॅनेजरची पदोन्नती मिळाली. वेटरची नोकरी करतानाही त्यांनी शिक्षणात खंड पडू दिला नाही. आयुष्यात पुढे जाण्याचे स्वप्न आणि त्यासाठी लागणाऱ्या कष्टाची डोळस यांची तयारी होती. टाटा स्टिलमध्ये त्यांना नोकरीची संधी मिळाली. कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांवर त्यांनी बोलायला सुरवात केली. हनुमंतराव डोळस यांच्यात असलेल्या नेतृत्व गुणामुळे व मनमिळाऊ स्वभावामुळे कर्मचारी युनियनची जबाबदारी त्यांच्यावर आली. 

कर्मचारी युनियनची मिळालेली संधीच डोळस यांना राजकारणाकडे घेऊन आली. मुंबई जिल्हा युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस, मुंबई प्रदेश युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसची जबाबदारी त्यांच्यावर आली. थेट राजकारणात झालेल्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह सर्वच दिग्गज नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर हनुमंतराव डोळस यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. पक्षाच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी राजकारण, प्रशासन आणि सर्वसामान्यांसोबतच संपर्क कायम ठेवला. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या तत्कालीन पंढरपूर लोकसभा मतदार संघातून त्यांनी 1999 मध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नही केला. आयत्यावेळी राजकीय गणिते बदलली आणि त्यांची संधी हुकली. संधी हुकली तरीही हताश न होता डोळस शेवटच्या क्षणापर्यंत सक्रियच राहिले. 

1999 मध्ये सत्ता परिवर्तन होऊन राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली. सत्ता येताच हनुमंतराव डोळस यांना चर्मोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. ज्या समाजात जन्मलो त्याच समाजासाठी काही तरी भरीव करण्याची संधी त्यांना मिळाली होती. ही जाणीव त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ठेवली. आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेले हे आर्थिक विकास महामंडळ हनुमंतराव डोळस यांच्या नेतृत्वाखाली फायद्यात आले. महामंडळाचा विस्तार वाढला. त्यांच्यातील प्रशासकीय कौशल्याची व दूरदृष्टीची चुणूक सर्वांनीच पाहिली. तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख, शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासह सर्वच नेत्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. महामंडळानंतर डोळस यांना विधानसभा/लोकसभा खुणावू लागली होती. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या तत्कालीन कर्जत-जामखेड (जि. नगर) मतदार संघातून त्यांनी 2004 ची विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारीही केली. आघाडीच्या जागा वाटपात हा मतदार संघ कॉंग्रेसकडे गेल्याने तिथेही त्यांची संधी हुकली. निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेली सर्व तयारी केल्याने बंडाचे निशाण फडवून आपण विजयी होऊ असा विश्‍वास त्यांच्यात होता. बंडाचे निशाण फडविण्याच्या तयारीत असलेल्या डोळस यांना शरद पवार यांनी शब्द दिला. तुला योग्य वेळी आमदार करतो असा हा शब्द होता. 

शरद पवार यांनी दिलेल्या शब्दावर विश्‍वास ठेवत ते दोन पावले मागे सरकले. 2009 च्या मतदार संघ पुनर्रचनेत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. आपण ज्या गावात, ज्या तालुक्‍यात जन्मलो तोच मतदार संघ राखीव झाल्याने डोळस यांच्यासाठी ही नामी संधी होती. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठिंब्यावर हनुमंत डोळस यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली. स्वप्नपूर्ती घडविणारा हा क्षण असल्याने त्यांनी या निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 2009 मध्ये त्यांना तब्बल 17 हजार मताधिक्‍याने आमदारकीची संधी मिळाली. 2009 व 2014 अशा दोन निवडणुकीत त्यांनी माळशिरस तालुक्‍याचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या माध्यमातून डोळस यांना 2017 च्या हिवाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. वेटरपासून सुरू झालेला त्यांचा तालिका अध्यक्षापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. हनुमंत डोळस यांना संकल्प आणि सिद्धी असे एक मुलगा व मुलगी आहे. एमबीएचे शिक्षण पूर्ण करून संकल्प सध्या राष्ट्रवादीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. सिद्धी या लंडनमध्ये फॅशन डिझाईनिंग क्षेत्रात आहेत. 
 

महामंडळाला मिळाले नाव 
चर्मकार समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी असलेल्या चर्मोद्योग महामंडळाला संत रोहिदास महाराजांचे नाव मिळाले. या महामंडळाला नाव देण्याचा निर्णय हा तत्कालीन अध्यक्ष कै. हनुमंतराव डोळस यांच्याच काळात झाला. महामंडळाच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा कायमस्वरूपी दर्जा देण्याचाही निर्णय याच कालावधित झाला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हनुमंत डोळस यांच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थाने वाव दिला. कधीकाळी रेल्वे स्थानकावर बूट पॉलिश करणाऱ्या व्यक्तीला त्याच समाजासाठी असलेल्या महामंडळाचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. या संधीचे डोळस यांनी सोने केले. दर्यापूर, कोल्हापूर यासह महाराष्ट्रातील चर्मोद्योगाला त्यांनी हक्काचे व्यासपीठ दिले. कोल्हापुरी चप्पलला जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी महामंडळाने मोलाची भूमिका बजावली.