आव्हानांची भीती काढून टाका - दातोश्री इद्रीस जाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

दातोश्री इद्रीस जाला, मलेशियाच्या पेमांडू प्रकल्पाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी

परिवर्तन घडवण्यासाठी अशक्य वाटणारी आव्हाने स्वीकारली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी टीममधील प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून आव्हानांना सामोरे जाताना वाटणारी भीती काढून टाकली तर यश मिळतेच.

दातोश्री इद्रीस जाला, मलेशियाच्या पेमांडू प्रकल्पाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी

परिवर्तन घडवण्यासाठी अशक्य वाटणारी आव्हाने स्वीकारली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी टीममधील प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून आव्हानांना सामोरे जाताना वाटणारी भीती काढून टाकली तर यश मिळतेच.

परिवर्तनशील नेतृत्वाची सहा सूत्रे मी ठरवली आहेत. परिवर्तनाच्या प्रक्रियेचे दोन टप्पे पडतात. ''डुईंग'' (कृती करा) आणि ''बीईंग'' (पारंगत व्हा). पण, बीईंगचे अनेक टप्पे असतात. डुईंगमध्ये मात्र लगेच कृती करावी लागते. त्यामुळे मी डुईंगच्या बाजूने आहे. एखादे काम लगेच सुरू करावे. सायकल शिकण्यासाठी आपण आधी वेगाचा, मग तंत्रज्ञानाचा अभ्यास करून मग सुरुवात करत नाही. आपण लगेच शिकायला सुरुवात करतो. तशीच ही प्रक्रिया असायला हवी. ट्रान्सफॅार्मेशनल लीडरशिपची सहा सूत्रे आहेत. पहिले आहे, अशक्य वाटणारी आव्हाने स्वीकारणे. जे इतरांना अशक्य वाटते ते मी करेन असे ठरवायला हवे. अत्यंत तोट्यात असलेली कंपनी आम्ही अत्यंत कमी कालावधीत नफ्यात आणली होती. दुसरे की-परफॉर्मन्स इंडिकेटर्सवर भर द्यायला हवा. मलेशियन विमान कंपनीचा तोटा कमी करताना आम्ही अनेक मुद्द्यांचा अभ्यास करून तोट्यातील मार्ग बंद केले आणि अल्पावधीत कंपनी नफ्यात आणली. तीन- प्रत्येक कृतीला शिस्त असली पाहिजे. प्रत्येक कामाचे विभाजन करून त्याच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे गरजेचे असते. त्यात सातत्य राखवे लागते. उदाहरणच द्यायचे झाले तर एका नदी सुधारणेवर सरकारच्या ४५ एजन्सी एकाचवेळी काम करत होत्या. पण, नेमके कोण काय करणार आहे हे माहीत नसल्याने काम वेळेत पुढे गेले नाही. जबाबदाऱ्या निश्चित केल्या तरच काम वेळेत पूर्ण होईल. नवी नेतृत्व घडवली पाहिजेत. त्यानुसार आम्ही एखादे काम करताना स्वतःला एका जागी लॉक करून घेतो, आठ आठवडे एका जागी बसून ते पूर्ण करतो आणि त्यातून असे नवे नेतृत्व तयार होते. मग त्यांच्यावर जबाबदारी टाकता येते. कोणतेही मोठे काम करण्यासाठी अनेक लोकांना एकत्र आणा. अधिकाधिक जण सहभागी झाले की ते आव्हान यशस्वी करता येतेच. त्यांच्याशी नम्रतेने बोलून एक प्रकारचे नाते निर्माण करा. मूल्य आणि कृती यावर चांगली माणसे निवडा. चांगल्या कामाकडे पाहा, वाईट गोष्टींना चांगल्याकडे न्यावे लागेल. त्यातूनच ट्रान्सफॉर्मेशनल लिडरशीप तयार होते.

त्वरित कृती हवी
डुईंगबाबत (कृती करा) सांगताना दातोश्री म्हणाले, की सायकल शिकण्यासाठी आधी आपण चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करा. वेग-तंत्रज्ञान जाणून घ्या. त्यानंतर पीएच.डी. करा. नंतर तुम्हाला सायकल देणार, असे सांगितले तर... म्हणजेच सायकल कशी लगेच चालवायला शिकतो. तशीच ही डुईंगची प्रक्रिया आहे. वेळ न दवडता लगेच कृती करायला हवी. मी डुईंग गटाचा आहे.

अशक्य वाटणारी कामे करून दाखविली
डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या दुस-या दिवशीच्या सत्राची सुरुवात मलेशियाच्या पेमांडू प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दातोश्री इद्रीस जाला यांच्या भाषणाने झाली. त्यांचे स्वागत डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार यांनी केले. ते म्हणाले, अनेकदा आपण म्हणतो की तिकडे हे होते, आपल्याकडे का होत नाही. पण सर्वसामान्यांना अशक्य वाटणारी अशी कामे दातोश्री जाला यांनी मलेशियात करून दाखवली आहेत. त्यांचे सारेच काम अविश्वसनीय वाटते. आपल्याकडच्या पालिका शाळांपेक्षा दुस्थितीतील मलेशियातील शाळांचे तीन वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये परिवर्तन केले आहे. सरकार आणि खासगी क्षेत्राच्या माध्यमातून छोट्या किराणा दुकानांचे त्यांनी अल्पकाळात मोठ्या सुपर स्टोअर्समध्ये रूपांतर केले आहे. परिवर्तनाचे हे मॉडेल महाराष्ट्रासाठी, देशासाठी उपयुक्त ठरेल.

------------------------------------------

तंत्रज्ञानातील प्रयाेगांनी कला वृद्धिंगत
पेट्रा ओशावस्की
स्टेट सेक्रेटरी इन द मिनिस्ट्री ऑफ सायन्स, रिसर्च ऍन्ड द आर्टस बेडेन विंटेनबर्ग, जर्मनी

भारताने डिजिटल सॉफ्टवेअरमध्ये मोठी प्रगती केली आहे. तंत्रज्ञान ही एक खूप सुंदर कला आहे, ज्याचा सुयोग्य वापर कसा करावा, हे आपल्याला िस्टव्ह जॉब्सने दाखवून दिले आहे. डिजिटल तंत्रज्ञानात कला हा महत्त्वाचा पैलू आहे. निसर्गात आपल्याला कलेची अनेक रूपे दिसत असतात. जी कला आणि तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला उतरवता येतात. डिजिटल तंत्रज्ञानात नावीन्यपूर्ण प्रयोग सातत्याने घडवून आणल्यानेच ही कला अधिक वृद्धिंगत होणार आहे.

------------------------------------------

देशात संशोधनासाठी मोठी संधी
प्रा. डॉ. काट्जा शाईन्क-लेलॅन्ड
फ्राऊनहॉपर इन्स्टिट्यूट फॉर इंटरफेशियल इंजिनिअरिंग अँड बायो टेक्‍नॉलॉजीच्या (आयजीबी) संचालक

हैद्राबादमध्ये बायोमेडिकल क्षेत्रातील संशोधनाच्या निमित्ताने सध्या लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. उर्वरीत भारतातही बायोमेडिकल क्षेत्रासाठी मोठी संधी आहे. म्हणूनच नवीन उद्योजकांना या क्षेत्रात योगदान देता यावे यासाठी सकाळ माध्यम समुहासोबत आम्ही नव्या एंटरप्रेनर्सना पाठबळ द्यायला तयार आहोत. कर्करोगावर सध्या जगभरातील विविध देशांमध्ये आमच्या संस्थेकडून संशोधनाचे काम सुरू आहे. आपल्या देशातील जैविक वैविध्यता, भौगोलिक रचना पाहता बायोमेडिकल क्षेत्रासाठी देशात मोठी संधी उपलब्ध आहे. देशातील वैविध्यपूर्ण रचनेमुळेच संशोधनासाठी एक मोठी संधी म्हणून आम्ही भारताकडे पाहतो आहोत. भारतात नवे एंटरप्रेनर्स घडवण्यासाठी म्हणूनच आम्ही मार्गदर्शन करण्याची तयारी ठेवली आहे. ज्यानुसार आयटी क्षेत्रासाठी जगभरातील संस्था कंपन्यांचे भारत आकर्षण आहे, त्यानुसारच बायोमेडिकल क्षेत्रासाठी भारतातही ही संधी म्हणून पाहणे गरजेच आहे. फ्रॉनहॉपर इंस्टिट्युट फॉर इंटर फेसिअल इंजिनिअरींग आणि बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जपानमध्ये बायोटेकचे अनेक लॅब कार्यरत आहेत. जगभरात बायोटेक क्षेत्राच्या संशोधनाच्या निमित्ताने तीन हजार संशोधक आमच्या सोबत सध्या कार्यरत आहेत. भारतातूनही या क्षेत्रासाठी योगदान मिळावे यासाठी अधिकाधिक इंटरप्रेरन या क्षेत्रासाठी वळण गरजेच आहे.

------------------------------------------

हास्य टिपणारे Laugh अॅप

याल गेवर
इंटररिलेशनशीप अँड कन्व्हर्जन्स ऑफ टेक्नॉलॉजी एण्ड अार्ट
आपण जेव्हा हसतो तेव्हा एक लाख तरंग लहरी निर्माण होतात. तरंग लहरीच्या निमित्ताने माणसातील विविध प्रकारचे हास्य टिपण्याची संधी मला मिळाली. हा प्रकल्प करताना खूप मजा आली. अखेर अशा अभिनव प्रयोगाचे आता Laugh हे अॅप्लिकेशन तयार केले आहे. यामधून अनेकांना आपले हास्य कसे आहे, हे ओळखण्याची संधी आहे.  अनेक प्रकल्पांमध्ये अद्ययावत प्रिंटिंग तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. नासाच्या प्रकल्पात अंतराळात अशी कलाकृती साकारणार का, असे विचारण्यात आले होते. पण, सुरुवातीला माझ्या व्यस्त कामामुळे ही संधी नाकारली. अंतराळात अशी कलाकृती साकारणे आव्हान होते. ही कलाकृती करताना  तीन वर्षांचा कालावधी गेला. थ्री-डी तंत्रज्ञानातून कलाकृती साकारण्यासाठी झीरो ग्रॅव्हिटी प्रिंटर उभारण्यापासूनची आव्हाने होती. पण, प्रकल्प करताना मजा आली. वॉटर डान्सर, न्युक्लिअर एक्स्प्लोजन, कार कोलायडर, लाफ यांसारख्या प्रकल्पांत प्रत्येक मॉडेलसाठी वापरलेले मटेरिअल वेगळे होते. पण, प्रत्येक कलाकृतीसाठी तितकाच वेळ लागला. कार कोलायडरच्या कलाकृतीत प्रत्यक्षात फेरारीसारख्या कंपनीकडून कारच्या रंगाचा नमुना मागवला. कलाकृतीत हुबेहूब रंग साकारणे शक्य झाले.

------------------------------------------

तंत्रज्ञान अधिकाधिक सुलभतेच्या दिशेने
ख्रिस्तीन रिडेल
झेडकेएम कार्ल्स ऱ्हूच्या व्यवस्थापकीय संचालक

जागतिक बदलाचे परिणाम कला, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर सकारात्मक झालेले आहेत. २१ व्या शतकात झालेली ही अद्‌भुत क्रांती आहे. गेल्या तीन दशकांत तंत्रज्ञानात झालेल्या बदलाचे परिणाम डिझाइनमध्येही होत गेलेले आहेत. तंत्रज्ञान अधिकाधिक सुलभतेच्या दिशेने जात आहे.

------------------------------------------

डेटाविषयी नैतिक निकष गरजेचे
प्रा. गेसी यूस्ट
बर्लिन कला विद्यापीठातील डिझाईन रिसर्च लॅबच्या प्रमुख

डिजिटल युगाने माहितीचे भांडार आपल्यासमोर खुले केले आहे, ज्यामध्ये वैयक्‍तिक माहितीही आहे. डिजिटलमध्ये सामावलेली तुमची वैयक्‍तिक माहिती कोणाला वापरायला द्यायची अथवा नाही, याचे आंतरराष्ट्रीय नैतिक निकष तयार होण्याची आवश्‍यकता अाहे. सामाजिक बदलासाठी डिजिटल महत्त्वाची भूमिका बजावत असताना त्याचा वापर जबाबदारीने व्हावा यासाठी आपल्याला जागरूक असावे लागणार आहे. स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने आपण जात असताना तुमची वैयक्‍तिक माहिती (डेटा) मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. लोकहितासाठी अशाप्रकारचा डेटा वापरणे योग्य. मात्र, त्याचा व्यावसायिक वापर करताना काही निर्बंध असावेत. त्यासाठी नैतिकता पाळण्याची आवश्‍यकता आहे. जर्मनीमध्येही बहुतांश लोकांना डिजिटलचे ज्ञान नसल्याने त्यांच्याकडील माहितीचा दुरुपयोग केला जातो किंवा ते फसवले जातात. डिजिटलने केलेली क्रांती आपल्याला स्वीकारावीच लागेल किंबहुना प्राथमिक शिक्षणातच डिजिटलचा समावेश असावा. शिवाय तंत्रज्ञानापासून फटकून राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही आपल्याला डिजिटल भविष्यासाठी याप्रवाहात आणावे लागेल. त्यासाठी विविध क्लुप्त्यांचा वापरही करता येऊ शकेल.

Web Title: Remove the fear challenges