आचारसंहिता भंगाची मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मुंबई - प्रचार संपल्यानंतरही वृत्तवाहिन्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू असलेल्या मुलाखती आणि ते सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे; परंतु मुख्यमंत्री आणि अन्य राजकीय नेत्यांच्या वृत्तवाहिन्यांवरील मुलाखतींवर निर्बंध आणता येणार नाहीत, असे राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी स्पष्ट केले आहे.

तक्रारीबाबत पत्रकारांना माहिती देताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

महापालिका निवडणुकीचा प्रचार 19 फेब्रुवारीला सायंकाळी संपला; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मुलाखती देऊन घोषणांचा धडाका लावला आहे. ते विरोधकांना धमकावतही असल्याने हा आचारसंहितेचा भंग आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी केला.

प्रचार संपल्यानंतरही मुख्यमंत्री मुलाखती देऊन सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहेत. प्रचार करायचा असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. मुख्यमंत्री वृत्तवाहिन्यांना देत असलेल्या मुलाखती या "पेड न्यूज' नाहीत ना, अशीही शंका राऊत यांनी व्यक्‍त केली.

शिवसेना पराभूत मानसिकतेतून तक्रार करण्याचा रडीचा डाव खेळत आहे, मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला नाही, असा दावा करून भाजपने शिवसेनेवर पलटवार केला आहे.

शिवसेनेला उत्तर देताना भाजपचे प्रवक्‍ते माधव भांडारी म्हणाले, निवडणूक आयोग तक्रारींची शहानिशा करेल; परंतु सतत रडीचा डाव खेळण्याची सवय त्यांना लागली आहे.

"सामना'वर निर्बंध नाही
भाजपने "सामना'वर बंदी घालण्याची मागणी केली असली, तरी सर्वोच्च न्यायालयाने वर्तमानपत्रांचे अभिव्यक्‍तिस्वातंत्र्य मान्य केले आहे. त्यानुसार "सामना'वर बंदी आणता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Report violations of the Code of Conduct chief minister