'जिल्हा बँकांवरील निर्बंध शेतकऱ्यांना मारक'

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

जिल्हा बँकेवरील निर्बंध मागे घ्या- मुंडे
'शेतकऱ्यांचे व्यवहार जिल्हा बँकेतून होतात. सध्या शेतमाल विकून शेतकऱ्यांकडे पैसे आले आहेत. शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा बँकेंवरील निर्बंधाचा निर्णय मागे घ्यावा, अशी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे,' असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मुंबई : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यास आणि जमा करण्यासंदर्भात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रोख लावल्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

'शेतकऱ्यांची खाती ही जिल्हा बँकेतच आहेत. त्यामुळे जिल्हा बँकांवर आलेले निर्बंध गंभीर आहेत. तिथे शेतकऱ्यांची कर्जं आहेत. त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक आहे,' अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली. शिवाय, केंद्र सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी केली. 

ते म्हणाले, 'हिवाळी अधिवेशन कमी दिवस ठेवण्यात आले आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी तीन आठवडे करावा.'

'सामान्य माणसांची एवढी काळजी असेल, तर शिवसेनेने नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात भूमिका घेण्यासाठी सरकारमधून बाहेर पडून स्वाभिमान दाखवावा. शिवेसेनेचे ओठावर एक आणि पोटात वेगळे असते,' अशी टीका विखे पाटील यांनी केली. 

 

Web Title: restrictions on district banks affecting farmers, opposition slams govt