मासेमारीसाठी एलईडीचा वापर करण्यास प्रतिबंध 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 मे 2018

मुंबई - राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (12 सागरी मैल) यांत्रिक तसेच यंत्रचालित (बोटी) मासेमारी नौकांना कृत्रिम एलईडी लाइट, माशांना आकर्षित करणारे दिवे किंवा कोणतीही इतर प्रकाश उत्सर्जित करणारी कृत्रिम उपकरणे बसविणे अथवा त्याचा मासेमारीसाठी वापर करण्यास प्रतिबंध करण्याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने काढली आहे. 

यांत्रिक तसेच यंत्रचालित (बोटी) मासेमारी नौकांवर बेकायदेशीररीत्या एलईडी लाइटची यंत्रणा लावून मासेमारी क्षेत्रात प्रकाश झोत टाकून मासेमारी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी मासे जमा होऊन मासेमारी होत असल्याने सागरी क्षेत्रातील माशांच्या साठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच पारंपरिक होडी वापरून मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांचे हितसंबंध जपण्यासही मर्यादा येत असल्याने ही अधिसूचना काढली आहे. केंद्र शासनाने दिनांक 10 नोव्हेंबर 2017 च्या आदेशानुसार सागरी जलधी क्षेत्राबाहेरील भारतीय विशाल आर्थिक क्षेत्रात ट्रॉलिंग, पर्ससीन आणि अथवा जाळी यांचा वापर करणाऱ्या यांत्रिक, तसेच यंत्रचलित मासेमारी नौकांवर जनरेटरवर अथवा जनरेटरशिवाय चालणारी विनाशकारी मासेमारी पद्धतीस प्रतिबंध केला आहे. प्रतिबंध करण्यात आलेल्या विनाशकारी मासेमारी पद्धतीमध्ये बुल व पेअर-ट्रॉलिंगचाही समावेश आहे. तसेच पाण्याखाली, बुडीत अथवा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते कृत्रिम दिवे, एलईडी लाइट, माशांना आकर्षित करणारे दिवे किंवा कोणतीही इतर प्रकाश उत्सर्जित करणारी कृत्रिम साधने, उपकरणे बसविणे, अथवा त्याचा उपयोग करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही केंद्र शासनाने राज्य शासनाला दिल्या आहेत. 

Web Title: Restrictions on using LEDs for fishing