परतीच्या पावसाला 'या' आठवड्यात होणार सुरुवात, तोपर्यंत बरसणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे.

पुणे : या वर्षीचा मान्सून सर्वत्रच जोरदार बरसत आहे. कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यानंतर सध्या बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी व गुरुवारी पुण्यात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. येथील अतिवृष्टीमुळे मृतांचा आकडा 15 झाला आहे. त्यामुळेच सर्वच नागरिक आता पाऊस थांबावा असा धावा देवाकडे करत आहेत. परंतू ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे.

दरम्यान, स्कायमेटनं दिलेल्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून उशिरा दाखल झाला आहे, त्यामुळे तो परतीलाही उशिराच लागणार आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार आहे, त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. पुढील काही दिवसांत मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर परतीच्या पावसापर्यंत सगळ्याच राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.

दरम्यान, खरंतर परतीच्या पावसाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानपासून सुरू होते. पण यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यात हवामानातील बदलामुळे परतीचा पाऊसही लांबणीवर गेला आहे. हवामानातील बदलामुळे पुढच्या काही दिवसांत उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा या भागांत पाऊस मुसळधार बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: return journey of the monsoon will be delayed skymet has said monsoon will go back in 2nd week of october