जीएसटीमुळे होईल महसुलात वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

औरंगाबाद - औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यांत केंद्रीय उत्पादन व सेवाशुल्क विभागाअंतर्गत एकूण करदात्यांची संख्या 16 हजार इतकी आहे. सध्या या अंतर्गत नोंदणी सुरू असून, वस्तू व सेवा कर कायदा लागू झाल्यानंतर पुनर्रचनेपश्‍चात चार हजार करदात्यांची घट होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, महसुलात वाढ होईल, असा आशावाद आयुक्‍त सी. एल. महर यांनी मंगळवारी (ता. दोन) पत्रपरिषदेत व्यक्‍त केला.

श्री. महर म्हणाले, ""मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून केंद्रीय उत्पादन व सेवा करापोटी सोळा हजार करदात्यांकडून 2300 कोटी रुपयांचा कर विभागाला प्राप्त झाला. जीएसटीनंतर विक्रीकर, व्हॅट आणि सेवाकर वगळून जीएसटी एकच कर भरावा लागणार आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रामुख्याने सर्वसामान्यांचा 10 ते 12 टक्‍के कर वाचणार आहे. जुन्या कायद्याअंतर्गत प्रलंबित प्रकरणे पुढेही चालूच राहणार आहेत. मात्र, एक जुलैपासून लागू होत असलेल्या कायद्याबद्दल जास्तीत-जास्त व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, सेवाकर दाते आणि उत्पादकांपर्यंत हा कायदा पोचविण्याचे उद्दिष्ट आहे. पॉवर पॉंइंट प्रेझेंटेशनचा वापर करून करदात्यांना जीएसटी करप्रणाली समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल.''

आजपासून जीएसटी जागरूकता अभियान
केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग संपूर्ण मराठवाड्यात जीएसटी जागरूकता अभियान राबविणार आहे. 3 मे ते 18 मेपर्यंत हे अभियान राबविले जाणार आहेत. औरंगाबादेतील एमजीएम येथील रुख्मिणी सभागृहात दुपारी तीन वाजता या अभियानाला सुरवात होईल. जीएसटी सदंर्भात ट्रेडर्स आणि उत्पादकांना माहिती व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणी, त्यानंतर जीएसटीची कार्यपद्धती यात समजावून सांगण्यात येणार आहे. आठ जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या दिवशी हा उपक्रम होणार आहे. जालना येथे 4 मे रोजी कलश सीड्‌स, ट्रेनिंग हॉल, मंठा चौफुला येथे होणार आहे. बीड येथे 5 मे रोजी, नांदेड येथे 9 मे रोजी नियोजन भवनात जागरुकता अभियान राबविले जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे दहा मे रोजी, हिंगोली येथे 11 मे रोजी केमिस्ट भवन, लातूरला 17 मे रोजी डॉ. भालचंद्र ब्लड बॅंक, तर उस्मानाबादला 18 मे रोजी जागरूकता अभियान राबविले जाणार आहे.

Web Title: revenue increase by gst