राज्यभरातील रिक्षाचालक 9 जुलैला जाणार संपावर!

वृत्तसंस्था
रविवार, 7 जुलै 2019

- रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी, यांसारख्या मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालक संघटना जाणार संपावर

मुंबई : मुंबई, ठाण्यासह राज्यातील अन्य शहरांतील रिक्षाचालक येत्या 9 जुलैला संपावर जाणार आहेत. रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी, यांसारख्या मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालक संघटना संपावर जाणार आहेत. 

रिक्षा मालक-चालक संघटनांनी राज्य परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन त्यांच्यासमोर मागण्या मांडल्या होत्या. मात्र, या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे आता पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधील लाखो रिक्षाचालक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

दरम्यान, रिक्षा चालक-मालक संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्यानंतर सर्वसामान्यांचे हाल होणार आहे. 

या आहेत प्रमुख मागण्या : 

रिक्षा चालक-मालकांसाठी असलेले कल्याणकारी महामंडळ परिवहन खात्यांतर्गत असावे 

- ओला, उबरसारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी 

- विमा कंपनीत भरण्यात येणारे पैसे तिथे न भरता कल्याणकारी महामंडळात जमा करावे 

- चालक-मालकांना पेन्शन, उपदान (ग्रॅज्युईटी), भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय मदत दिली जावी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw strike on 9 July in Maharashtra