दुसरी नोकरी शोधण्याचा अधिकारच 

सुनीता महामुणकर 
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मुंबई - कोणत्याही खासगी कंपनीमध्ये कितीही गोपनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीचा राजीनामा देण्याचा आणि अन्य नोकरी शोधण्याचा अधिकार आहे. कंपनीची गोपनीय माहिती खुली होईल, या भीतीने कोणतीही कंपनी त्या कर्मचाऱ्याला दुसरी नोकरी करण्यापासून मनाई करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. 

प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे आणि जगण्यासाठी स्वतःच्या इच्छेप्रमाणे काम करण्याचाही अधिकार आहे. या अधिकारावर करार किंवा शर्तींच्या एकांगी प्रक्रियेमधून आस्थापना किंवा कंपनी व्यवस्थापन बाधा आणू शकत नाही, असेही उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील देशमुख यांनी निकालपत्रामध्ये स्पष्ट केले आहे. 

पंधरा वर्षांपासून औरंगाबादमधील एका फिल्म कंपनीच्या संशोधन विभागात उच्च पदावर काम करणाऱ्या विनय मारवा (नाव बदलले आहे) या अधिकाऱ्याने न्यायालयात याचिका केली आहे. नोकरीवर रुजू होताना केलेल्या करारानुसार ही कंपनी सोडल्यावर तीन वर्षे इतर कंपनीत कोणत्याही प्रकारे नोकरी न करण्याची अट ठेवण्यात आली होती. मागील वर्षी डिसेंबरमध्ये मारवा यांनी ही नोकरी सोडण्यासाठी राजीनामा दिला. मात्र, हे राजीनामा पत्र संमत करण्यास कंपनीने नकार दिला आणि कनिष्ठ न्यायालयात दावा दाखल करून संबंधित अधिकाऱ्याने पुढील तीन वर्षे अन्यत्र नोकरी करू नये, अशी मागणी केली. ही मागणी कनिष्ठ न्यायालयाने अंतरिम आदेशामध्ये मंजूर केली होती. याविरोधात मारवा यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यांची बाजू ॲड्‌. आर. एन. धोरडे यांनी मांडली.

करार बेकायदा 
भरपाईची तरतूद नसल्याने करार बंधनकारक नाही.
इच्छेप्रमाणे जगण्यासाठी काम करण्याचा अधिकार.
कंपनीची गोपनीय माहिती खुली होईल, म्हणून अन्यत्र नोकरी करण्यास अडवता येणार नाही.

Web Title: The right to find another job