नद्यांना वाहू द्या!

River
River

नदीप्रदूषण पूर्णपणे मानवनिर्मित आहे. दोन-अडीच दशकांपूर्वी राज्यातील नद्यांची स्थिती चांगली होती. मुले लहान वयातच नदीत पोहण्यात तरबेज व्हायची. पूर आला की, बिनदिक्कतपणे सूर मारायची. नदीला आता अवकळा आली. जीवनदायिनी मृतप्राय झाली आहे. तिच्याविषयी.

जळगाव - वाळूउपशाने आटल्या नद्या
बेसुमार जंगलतोड आणि अनियंत्रित वाळूउपशाने खानदेशातील नद्यांची दुरवस्था आहे. खानदेश खडकाळ असल्याने पाणी जिरण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने नद्या पावसाळ्यात महिनाभरच वाहतात. तापीचा काही भाग, गिरणा, पांझरा, कांग, गूळ, बोरी, सुकी, वाघूर, मोर यांसह अनेक नद्यांची पात्रे मोठी असून धरणे गाळामुळे कोरडीठाक आहेत. सातपुड्यातील बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलाय. शेंदवडच्या (ता. साक्री) भवानी डोंगरातून उगम पावत १३० किलोमीटर प्रवास करणारी पांझरा नदी धुळे जिल्ह्याची जीवनवाहिनी. ती मुडावदला (ता. शिंदखेडा) तापीला मिळते. प्रवाही पांझरेसाठी १०० कोटींचा मंजूर झालेला प्रकल्प बारगळला. 

परभणी - नद्या कोरड्या 
जिल्ह्याची गोदावरी प्रमुख नदी पश्‍चिमेकडून पूर्वेकडे पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी, गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्‍यातून वाहत पुढे नांदेड जिल्ह्यात प्रवेशते. जिल्ह्याच्या वायव्येकडील मध्य भागातून पूर्णा आणि तिच्या उपनद्या करपरा, दुधना वाहत जातात. या नद्यांच्या खोऱ्यात जिल्हा असून, गोदावरीवर मुळी, मुदगल, तारुगव्हाण व ढालेगाव बंधारे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. 

सातारा - ‘कृष्णा’च्या जलसंस्कृतीचा लोप 
सुमारे २०० किलोमीटरचा प्रवाह जिल्ह्यास लाभलेल्या कृष्णेमुळे काठ सुजलाम-सुफलाम आहे. हीच कृष्णा आज सर्वाधिक प्रदूषित आहे. कोयना, वेण्णा, उरमोडी, तारळी, वसना, येरळा, बाणगंगा या नद्याही जिल्ह्यातून वाहतात. वसना, येरळा, बाणगंगा दुष्काळी फलटण, माण, खटावमधून वाहतात; पण पात्रे पावसाळ्यात कोरडी असतात. तीन जिल्हे, २१ तालुके आणि हजारो गावे महाराष्ट्रात ३४२ किलोमीटरच्या कृष्णाकाठावर आहेत. तथापि, धरणांमुळे नद्यांचा प्रवाह खंडित झाल्याने जलसंस्कृती लोप पावली आहे. 

नागपूर - कन्हान प्रदूषणाच्या विळख्यात
जिल्ह्याची जीवनदायी असलेली कन्हान नदी अमर्याद वाळूउपसा, कोळसा खाणींमुळे प्रदूषित आहे. उगमस्थानापासून वैनगंगेच्या संगमापर्यंत एकही धरण नसल्याने नदीतील पाणी वाहून जाते. ‘वेकोलि’च्या तीन कोळसा खाणींतील हजारो गॅलन सल्फरयुक्त पाणी कन्हान नदीत सोडल्यामुळे ती धोक्‍यात आहे. नागपूर, कन्हान, कांद्री, कामठीसोबतच भोवतालचे नागरिक आप्तांचे रक्षाविसर्जन कन्हान पात्रात करतात. याच नदीतून पारशिवनी, मौदा, कुही, कामठी, कन्हान, खापरखेडा, कोराडी या मोठ्या शहरांसोबतच संलग्नित गावांना पाणीपुरवठा होतो. मात्र, गोसेखुर्द धरणातील पाणी अडवल्याने कोराडी, खापरखेडा औष्णिक केंद्रांचे, वेकोलिच्या दूषित पाण्यासह, नाग नदीदेखील याच नदीत विलीन होत असल्यामुळे कन्हानचे पाणी दूषित झाले आहे. 

नाशिक - वाहण्याचा हक्कच हिरावला
नाशिकपासून मराठवाड्यापर्यंत १३ जिल्ह्यांना पाणी पुरवणारी प्रमुख नदी गोदावरी. राज्यातील ४० टक्के भूभागाला पाणी देणाऱ्या गोदावरीसह जिल्ह्यात आठ ते दहा नद्यांवर लहान-मोठी २३ धरणे बांधलीत. त्यामुळे नद्यांची खळखळ थांबली. उगमस्थान त्र्यंबकेश्‍वरला गोदावरीवर नगरपालिकेने काँक्रिटीकरण करून नदीच गाडली. गोदावरी वालदेवी, नंदिनीसह विविध नदीपात्रांचे उगमस्थान येथे आहे.  गोदावरी, वालदेवी, नंदिनीसह विविध नद्यांचे रेखांकन झालेले नाही. नदी प्रवाहित राहण्यासाठी भूमिगत झरे, जलस्रोत, कुंडाची नैसर्गिक व्यवस्था असते. मात्र, एकट्या गोदावरीला मिळणारे १८ झरे नाले बनलेत. 

सांगली - गावे उठली नद्यांच्या मुळावर 
कृष्णा आणि वारणा या बारमाही नद्यांनी जिल्ह्याचा पश्‍चिम भाग समृद्ध आहे. त्यांच्यावरच दुष्काळी भागाच्या सिंचन योजना तरल्यात. पूर्व भागातील कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, तासगाव आणि मिरज तालुक्‍यांच्या दुष्काळ हटला. त्यांचाच प्रवास वाळवंटाकडे सुरू आहे. कृष्णा आणि वारणाचे प्रदूषण चिंताजनक आहे. सांडपाण्यामुळे त्यांची घुसमट होते. कृष्णा प्रदूषणाच्या अनुषंगाने १९७५ पासून शेरी नाला चर्चेत आहे. साडेदहा कोटींच्या योजनेवर ४२ कोटी खर्चूनही अपूर्ण आहे. चांदोली ते हरिपूर या वारणेच्या प्रवासात सहा साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, गावांचे सांडपाणी नदीत मिसळत आहे. 

औरंगाबाद - नदीला नाल्याचे रूप
मलिक अंबरने कधीकाळी खळाळत वाहणारी खाम नदी पाहूनच औरंगाबाद वसवले; परंतु हर्सूलच्या डोंगरात उगम पावून पुढे गोदावरीला मिळणारी खाम नदी शहराच्या बाहेर पडेपर्यंत गटारगंगा होते. वाळूजच्या पुढे गोदावरीकडे झेपावताना तिचे पात्र रुंदावले तरी औद्योगिक दूषित घटकांमुळे प्रदूषित होते. जिल्ह्यातील लहान-मोठ्या ४० पैकी २३ नद्यांची पात्रे कोरडीठाक आहेत. बेशरम, वेड्या बाभळींमुळे काही नदींच्या पाऊलखुणाही नाहीत. 

‘सकाळ रिलीफ फंडा’तून विकास
ग्रामविकास संस्था, सकाळ रिलीफ फंड आणि लोकसहभागातून औरंगाबाद तालुक्‍यातील चित्ते नदीचे पुनरुज्जीवन केले. सिंदोन डोंगरातून उगम पावलेल्या या नदीचे अस्तित्वत संपुष्टात आले होते. परंपरागत दुधाचा व्यवसाय पाणीटंचाईमुळे बंद पडला. आज केवळ सिंदोन गावच नव्हे, तर नदीकाठची २७ गावे, वाड्या, वस्त्यांचा पिणे आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटला आहे. 

मुंबई - नाल्यांच्याही नद्या व्हाव्यात!
२६ जुलै २००५ च्या महापुरानंतर मुंबईतील चार नद्यांच्या अस्तित्वाचा साक्षात्कार झाला. त्यानंतर त्यांचे प्रदूषण रोखण्याऐवजी रुंदीकरण आणि खोलीकरणावर भर दिला; तेथेच गफलत झाली. खोलीकरणासह नद्यांमध्ये येणारे सांडपाणी आणि कारखान्यांचे पाणी रोखण्यावर भर गरजेचा होता. तब्बल तपानंतर महापालिकेने मिठी नदीतील सांडपाणी रोखण्यासाठी किमान कागदोपत्री उपाय सुरू केले. मुंबईत मिठी, पोयसर, दहीसर आणि ओशिवरा अशा नद्या आहेत. त्या नाल्यांहून अधिक विद्रूप झाल्यात. अतिक्रमण रोखण्याकरता नदीकिनाऱ्यांवर काँक्रिटची संरक्षक भिंत उभारण्यास ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी गंभीर आक्षेप घेतलेत.  

सोलापूर - कोरडी भीमामाय
जिल्ह्यातील ११४० पैकी सुमारे ३०० गावं भीमेकाठी आहेत. भीमेबरोबरच सीना, नीरा, माण, भोगावती, बोरी महत्त्वाच्या नद्या. अपवाद वगळता बहुतेक गावांमध्ये टंचाई पाचवीला पुजलेली. भीमा नदीवर २१ बंधारे असल्यामुळे पात्र कोरडे राहते. नरसिंहपूरजवळ नीरा नदीचा भीमेशी संगम होऊनही भीमेत आठमाही पाणी नसते. उजनी धरणामुळे नदी कोरडी आहे. भीमेच्या पाण्याची गुणवत्ता हाही महत्त्वाचा मुद्दा. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील नदीकाठची गावे, उद्योगांतून १२३९.६३ दशलक्ष लिटर सांडपाणी भीमेत येते. त्यातील फक्त ६९७.७१ दशलक्ष लिटरवर (एमएलडी) प्रक्रिया होते. नदीकाठच्या नऊ औद्योगिक क्षेत्रातून ११२.५ एमएलडी सांडपाणी येते. त्यातील ११० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होऊनही रासायनिक द्रव्ये भीमेत आढळतात.

जिल्ह्यातील भीमाकाठची स्थिती भीषण आहे. उजनी धरणातील पाणी शहराला पिण्यासाठी सोडले तर पात्रात पाणी राहते. पात्रात चार फूट व्यासाच्या रिंगा टाकून उपसा होतो. 

गडचिरोली - नियोजनाअभावी दुष्काळ
जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत; परंतु नियोजनाअभावी दरवर्षी टंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याचे स्रोत घटताहेत. जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, बांडिया, इंद्रावती, पर्लकोटा, सती, खोब्रागडी, कठाणी; तसेच वैलोचना नद्या आहेत. १४०० ते १६०० मिलिमीटर पाऊस होऊनही टंचाईला सामोरे जावे लागते. मोठ्या नदीवर दहा ते पंधरा किलोमीटरवर बंधारे बांधले तर पाणीटंचाई घटेल; परंतु उपाययोजनाच केल्या जात नाहीत. जंगलाचे प्रमाण ७८ टक्के असतानाही कडक उन्हाळा सोसावा लागतो. नदीचे पात्र वाहते राहून, बारमाही पाण्यासाठी नियोजन करावे, असे पर्यावरणतज्ज्ञ मधुकर सोनकुवर सांगतात.

कोल्हापूर - पंचगंगेचे प्राणच धोक्‍यात
कारखान्यांचे सांडपाणी किंवा नाल्यांतील पाणी थेट नदीत मिसळत असल्याने पंचगंगेच्या प्रदूषणाचा विळखा घट्ट होतोय. इचलकरंजीत दूषित पाण्यामुळे पन्नासहून अधिक माणसांनी जीव गमावूनही ठोस उपाययोजना नाहीत. बारमाही पाणी आणि बागायतीमुळे शिरोळ तालुक्‍यात वर्षाला नव्वद कोटींची रासायनिक खते वापरल्याचे सर्वेक्षणात दिसलंय. प्रदूषण रोखण्यासाठी श्वेतपत्रिका काढली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ४५० कोटींचा आराखडा बनवला. पंचगंगा खोऱ्याचा अहवालही बनवला. परंतु तो कागदावरच आहे. कोल्हापुरातील दुधाळी नाल्यावर २६ कोटी रुपये खर्चून ‘एसटीपी’ बांधण्याचे काम अपूर्णच आहे. 

सांडपाणी थेट नदीत
कोल्हापूरमधील जयंती नाल्यावरील जलवाहिनी फुटून सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळते. कोल्हापूर, इचलकरंजीतून नागरी आणि औद्योगिक सांडपाणी, घनकचरा नदीत मिसळतो. इचलकरंजीतील ४० एमएलडीपैकी २० एमएलडी पाणी प्रक्रियेशिवाय नदीत मिसळते. त्यामुळे मृत मासे पाण्यावर तरंगण्याचे प्रकार वारंवार घडतात, जलपर्णींचाही विळखा आहे. 

एक मूठ रक्षा श्रद्धेसाठी
‘सकाळ’ने ‘चला, पंचगंगा वाचवूया’ अभियानाद्वारे जनजागृती केली. त्याला प्रतिसादार्थ ‘एक मूठ रक्षा श्रद्धेसाठी, उर्वरित शेतीसाठी’ ही संकल्पना रुजली. रक्षाविसर्जनावेळी एक मूठ रक्षा नदीत विसर्जित करून उर्वरित शेतीसाठी नेली जाते. याचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद ग्रामसभांत केली आहे. 

लातूर - मांजरा पात्राचे पुनरुज्जीवन
लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या दृष्टीने मांजरा नदी आणि धरण महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील मांजरा धरणापासून १४० किलोमीटर मांजरा नदीचे पात्र आहे. बारमाही पाण्यासाठी नदीपात्रात ११ उच्चस्तरीय बंधारे बांधलेत. कमी पावसामुळे पाणीप्रश्न निर्माण होतो.

उस्मानाबाद - बंधारे उभारण्याची गरज
जिल्ह्यात तेरणा व बोरी या प्रमुख नद्या. तेरणाचे उगमस्थान तेरखेडा (ता. वाशी). नदीवर तेर आणि माकणी येथे मध्यम प्रकल्प आहेत. बोरीचा उगम बोरी गावापाशी होतो. तिच्यावर नळदुर्ग येथे मध्यम प्रकल्प आहे. मांजरा भूम, वाशी, कळंब तालुक्‍यांतून वाहते. कमी पावसामुळे नद्यांचे पात्र कोरडे, तर प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी असते. त्यामुळे ठिकठिकाणी बंधारे उभारावेत. 

बीड - वाळूतस्करी रोखणे हाच उपाय
जिल्ह्यातून गोदावरी, मांजरा व सिंदफणा या प्रमुख तीन नद्यांसह रुटी, तलवार, कडी, बिंदुसरा, मांजरा, डोमरी नद्या वाहतात. गोदावरीवर माजलगाव, बिंदुसरा नदीवर बिंदुसरा धरण, तर मांजरावर मांजरा प्रकल्प आहे. मात्र, बेसुमार वाळूउपशामुळे नद्या धोक्‍यात आहेत. 

नगर - सीनेला अतिक्रमणांचा विळखा
शहराचा मैला ही नदी कित्येक वर्षांपासून वाहत आहे. अतिक्रमणाने वेढलेल्या सीनेत उडी मारूनही दुसऱ्या टोकाला जाणे अवघड आहे. आता अतिक्रमण हटाव सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला अर्थसंकल्पात २५ टक्‍के रक्‍कम प्रदूषण नियंत्रणावर खर्च करण्यास सांगितले. महापालिकेने सांडपाणी शुद्धीकरण संयंत्रणाच बसविलेली नाही. कचरा, सांडपाणी व मैलामिश्रित पाण्यामुळे नदी प्रदूषित आहे. 

का होते नदी प्रदूषित?
 उगमस्थानांचे डोंगर, पर्वतांचे सपाटीकरण. धूप थांबविणारी वनसंपदा नष्ट, खोऱ्यात जंगलतोड
 नदीकाठावरील शहरांत सिमेंट, डांबरी रस्त्यांमुळे भूगर्भात पाणी न मुरणे
 अखंड प्रवाहाचे भूमिगत झरे, कुंड आटणे; त्यांंचे नाल्यात रूपांतर, बेसुमार वाळूउपसा
 घरगुती, कारखान्यातील दूषित प्रक्रियाविरहीत पाणी; तसेच घनकचरा नदीत टाकणे
 धार्मिकतेच्या नावाखाली नदीकाठी अंत्यसंस्कार, रक्षाविसर्जन
 नदीत जनावरे, कपडे, वाहने धुणे, मूर्ती, निर्माल्य विसर्जित करणे
 सौंदर्यीकरणाच्या नावाखाली नदीकाठावर काँक्रिटीकरण, पात्रात वीटभट्ट्या आणि अतिक्रमणे

परिणाम नदीप्रदूषणाचे 
 मगरी, मासे, पाणपक्षी, कासव, खेकडे, मरळ, ओंब, झिंगे यांच्या प्रजाती धोक्‍यात
 दूषित पाण्यामुळे त्वचारोग, वंध्यत्व, कावीळ, जुलाब, कर्करोग यांसारख्या १६ रोगांना निमंत्रण
 वाळूउपशामुळे पात्रेच बदलली, तळ खरवडल्याने पात्रातील वनस्पतींचे जाळे नष्ट
 उथळ नदीपात्रामुळे थेट शहरात पाणी घुसण्याची भीती

काही उपाययोजना
 बांधकामासाठी वाळूवापरावर पूर्ण निर्बंध, पर्यावरणपूरक बांधकामाला प्रोत्साहन 
 स्थापत्य अभियांत्रिकी आणि वास्तुशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये पर्यावरणपूरक बांधकामला स्वतंत्र स्थान
 नदीकाठच्या गावांना सांडपाणी प्रक्रिया सक्ती. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जीवन प्राधिकरण, स्थानिक संस्था, सरकार समन्वय हवा
 सांडपाण्याच्या पुनर्वापराबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्ती
 नद्यांवर लघूबांध, नद्यांभोवती वृक्षारोपण करणे
 वाळूउपशाचे धोरण बदलावे, नद्यांचे डोहातील पाझर पुन्हा सुरू करणे 
 खोऱ्यातील भूजलस्तर वाढवण्यासाठी कंपार्टमेंट बंडिंग, डीप सीसीटी 
 नदीपात्रांचे रुंदीकरण व खोलीकरण 

(संकलन - सचिन जोशी, निखिल सूर्यवंशी, मधुकर कांबळे, विठ्ठल लांडगे, सुरेश नगराळे, संभाजी गंडमाळे, जयसिंग कुंभार, समीर सुर्वे, रजनीश जोशी, विनोद बेदरकर, शैलेंद्र पाटील, विजय राऊत, नरेश शेळके.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com