रस्ते सुरक्षा खड्ड्यात

शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मुंबई - रस्त्यावरील अपघातात 2015-2017 या तीन वर्षांत राज्यभरात तब्बल 38,000 जणांना प्राण गमवावा लागलेला असताना रस्ते सुरक्षा निधी मात्र वापराविना परत राज्याच्या तिजोरीत गेल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे यंदाच्या पावसाळ्यात राज्यभरात 14 जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब असतानाही रस्ता सुरक्षेच्या बाबतीत गांभीर्याचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्यातील विविध करांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा निधी जमा केला जातो. मागील वर्षीचा 30 कोटी रुपयांचा निधी परिवहन विभागाकडे जमा झाला होता. प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह राबवून जनजागृती व रस्ते सुरक्षेची पाहणी केली जाते. मात्र, यावर्षी ही परंपरा मोडीत काढत मे महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला. त्यामुळे गेल्या वर्षीचा 30 कोटी रुपयांचा निधी वापराविना पडून राहिल्याची बाब उघडकीस आली आहे. 

राज्यातील रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण पाहता रस्ते सुरक्षा हा सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेला कार्यक्रम राबविणे अभिप्रेत आहे. हा सुरक्षा सप्ताह जानेवारीमध्ये राबविला असता तर संबंधित विभागाकडे अपघाती रस्ते व त्यांचे गांभीर्य समोर आले असते. त्यातून ऐन पावसाळ्यात उपाययोजना करण्याचा कार्यक्रम हाती घेणे शक्‍य होते असा दावा परिवहन विभागातील सूत्रांनी केला आहे. मात्र, या निष्काळजीपणाची किंमत सामान्य नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याची खंत व्यक्‍त केली जात आहे. 

अपघातांची व त्यातील बळींची संख्या प्रचंड असतानाही रस्ते सुरक्षा सप्ताहाचा निधी वापराविना परत तिजोरीत जमा होणे हे निष्काळजीपणाचे लक्षण आहे. जनजागृती व संभाव्य धोका टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा सप्ताह अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण, प्रशासनाच्या केवळ निष्काळजीपणामुळे रस्त्यावरील अपघातात शेकडो लोकांचा बळी जाणे ही चिंतेची बाब आहे. 
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते 

राज्यातील स्थिती 
38,000 - 2015 ते 2017 या वर्षांतील रस्ते अपघातातील बळी 
12,264 - गेल्या वर्षातील अपघाती मृत्यू 
14 - या वर्षी आतापर्यंत खड्ड्यांमुळे दगावलेल्यांची संख्या 
30 कोटी रुपये - वापराविना परत गेलेले पैसे 

Web Title: Road Safety Fund without Use money back