
Nana Patole : "कोणी भुट्टा येईल आणि..." सोलापूर-माढा जागेवर दावा सांगत नाना पटोलेंचा रोहित पवारांना टोला
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाव न घेता रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोलापूर आणि माढा लोकसभेच्या जागेवर पटोलेंनी दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूरची जागा राष्ट्रवादीकडे देण्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकाण चांगलेच पेटले होते.
आज नाना पटोले सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरचे भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नाना पटोले यांनी सोलापूर आणि माढा लोकसभेवर काँग्रेसचा खासदार निवडून आणयचा आहे, असे वक्तव्य केले आहे. तसेच इथे कोणी भुट्टा येईल आणि काहीही बोलून जाईल हे खपवून घेणार नाही, असे म्हणत रोहित पवारांना टोला लगावला.
महाविकास आघाडीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरुन धुसफूस सुरू आहे. अजित पवार, नाना पटोले, संजय राऊत यांच्यामध्ये मतभेद निर्माण होत आहेत. नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दोनदा पराभव झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवरच निवडणूक न लढवता सोलापूरची राखीव जागा राष्ट्रवादीला द्यावी.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेतला जाईल, असे वक्तव्य रोहित पवार यांनी सोलापूर दौऱ्यावर केले होते. सोलापूर लोकसभा जागेवर राष्ट्रवादीने अप्रत्यक्ष दावा केल्याने सोलापुरात दोन काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला होता.
प्रणिती शिंदेंनी केला होता पलटवार -
सोलापूर लोकसभा जागेबाबत विधान करणारे आमदार रोहित पवार कोण आहेत? अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली होती.