पंढरपूर संकीर्तन सभागृहासाठी 10 कोटी रुपयांचा निधी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई  - पंढरपूर येथे संकीर्तन सभागृह उभारण्यासाठी 39 कोटी 43 लाख रुपये खर्च येणार असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने आज मंजूर केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

मुंबई  - पंढरपूर येथे संकीर्तन सभागृह उभारण्यासाठी 39 कोटी 43 लाख रुपये खर्च येणार असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने आज मंजूर केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

पंढरपूर नगर परिषदेच्या मंजूर विकास आराखड्यात आरक्षित करण्यात आलेल्या जागेवर हे संकीर्तन सभागृह उभारण्यात येणार असून, पंढरपूर येथे 1 जून 2016 रोजी झालेल्या नमामि चंद्रभागा परिषदेमध्ये नमामि चंद्रभागा प्राधिकरण स्थापन करण्याचा, तसेच पंढरपूर येथे संकीर्तन सभागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शासनाने नमामि चंद्रभागा प्राधिकरण स्थापन केले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संकीर्तन सभागृहासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मराठी भाषा विभागाने दासबोधाचे ऑडिओ बुक तयार केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील संत वाङ्‌मयाचे ऑडिओ बुक तयार करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी या वेळी दिले. 

चंद्रभागा नदीसाठी 20 कोटी 
पंढरपूरला आषाढी-कार्तिकी एकादशीच्या दिवशी व त्यानंतरही लाखो वारकरी आणि भक्त पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात. या लाखो वारकऱ्यांच्या मनात सामाजिक समतेचा आध्यात्मिक वारसा प्रवाहित करणारी चंद्रभागा महाराष्ट्राच्या निखळ, निरागस श्रद्धेचा मानबिंदू आहे. वारकरी आणि चंद्रभागा यांचे नाते अतूट आहे, हे लक्षात घेऊनच शासनाने नमामि चंद्रभागा अभियान राबविण्याचे राज्याच्या 2016-17 च्या अर्थसंकल्पात घोषित केले होते. 2022 पर्यंत ही नदी स्वच्छ करून तिचे संवर्धन करण्यासाठी राज्य अर्थसंकल्पात सुरवातीला 20 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्यक्रमात अधिकाधिक लोकसहभाग वाढावा, यासाठी www.namamichandrabhage.org हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. चंद्रभागा नदीत प्रक्रिया न केलेले पाणी वाया जाऊ नये, यासाठी सध्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देताना येथे वन विभागाच्या आठ हेक्‍टर जागेवर तुळशी उद्यान उभारण्याच्या कामास सुरवात होणार आहे. 

Web Title: Rs 10 crore for Pandharpur chanting hall