बळीराजासाठी खुषखबर ! ठिबक अनुदानासाठी 191 कोटी रुपये मंजूर 

तात्या लांडगे
बुधवार, 1 जुलै 2020

पुढील आठवड्यापासून अनुदान होईल वितरीत 
राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2020-21 मध्ये ठिकब अनुदानाचा 667 कोटींचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी पहिला हप्ता 191 कोटींचा मंजूर झाला असून एक लाख 10 हजार शेतकऱ्यांना आता त्यातून अनुदान वितरीत केले जाईल. दरम्यान, नुकतेच ठिबक केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी अर्ज करण्याची तारीख निश्‍चित झाली नसून प्रलंबित शेतकऱ्यांना अनुदान वाटप केल्यानंतर तारीख जाहीर केली जाईल. 
-शिरीष जमदाडे, संचालक, फलोत्पादन 

सोलापूर : राज्यातील दोन लाख 13 हजार 755 शेतकऱ्यांचे ठिबक अनुदानाचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी एक लाख तीन हजार 821 शेतकऱ्यांना 250 कोटींचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. आता उर्वरित एक लाख दहा हजार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकतेच 191 कोटी रुपये मंजूर झाले असून पुढील आठवड्यापासून प्रलंबित शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याची कार्यवाही सुरु होणार आहे. 

सततचा दुष्काळाचा सामना करणारा बळीराजा आता ठिबक सिंचनाकडे वळला आहे. दरवर्षी चार लाखांहून अधिक शेतकरी ठिबक अनुदानासाठी अर्ज करु लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर फलोत्पादन विभागाने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 667 कोटींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यापैकी 191 कोटींचा पहिला हप्ता राज्य सरकारने मंजूर केला असून पुढील आठवड्यापासून अनुदान वितरणाची कार्यवाही केली जाणार आहे. 2019-20 मध्ये अनुदानाच्या प्रतीक्षेतील एक लाख 10 हजार शेतकऱ्यांसाठी 170 कोटी रुपयांची गरज असून सरकारने मंजूर केलेल्या 191 कोटीतून संबंधित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

नव्या अर्जाची तारीख निश्‍चित नाही 
2020-21 या आर्थिक वर्षासाठी ठिबक अनुदानाचा 667 कोटींचा कार्यक्रम मंजूर झाला आहे. दरम्यान, यंदा नव्याने ठिबक केलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची तयारी करीत संपूर्ण कागदपत्रे संकलित केली आहेत. मात्र, अनुदानासाठी अर्ज कधीपासून करायचे, याचा मुहूर्त ठरलेला नाही. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत अपेक्षित महसूल जमा होत नसल्याने पुढील हप्ता कधीपर्यंत मिळेल हे निश्‍चित नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कधीपासून अर्ज करायचे हे ठरवले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुढील आठवड्यापासून अनुदान होईल वितरीत 
राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2020-21 मध्ये ठिकब अनुदानाचा 667 कोटींचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी पहिला हप्ता 191 कोटींचा मंजूर झाला असून एक लाख 10 हजार शेतकऱ्यांना आता त्यातून अनुदान वितरीत केले जाईल. दरम्यान, नुकतेच ठिबक केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी अर्ज करण्याची तारीख निश्‍चित झाली नसून प्रलंबित शेतकऱ्यांना अनुदान वाटप केल्यानंतर तारीख जाहीर केली जाईल. 
-शिरीष जमदाडे, संचालक, फलोत्पादन 

ठिबक अनुदानाची स्थिती 
मंजूर अर्ज 
2,13,755 
अनुदान मिळालेले अर्जदार 
1,03,821 
अनुदानाच्या प्रतीक्षेतील शेतकरी 
1,09,934 
अनुदान मंजूर 
191 कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rs 191 crore sanctioned for drip grant