आरटीईच्या निम्म्या जागा रिक्त! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या आतापर्यंत दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यानंतरही राज्यातील तब्बल एक लाख 16 हजार 808 जागांपैकी 67 हजार जागांवरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत; तर तब्बल 49 हजार 754 जागा रिक्त आहेत.

मुंबई - बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या आतापर्यंत दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यानंतरही राज्यातील तब्बल एक लाख 16 हजार 808 जागांपैकी 67 हजार जागांवरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत; तर तब्बल 49 हजार 754 जागा रिक्त आहेत. शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तरी तिसरी सोडत काढण्याबाबत अद्यापही शिक्षण विभागामध्ये गोंधळ सुरू आहे. 

आरटीई प्रवेशाची पहिली सोडत 8 एप्रिल रोजी काढण्यात आली. या सोडतीमध्ये राज्यात 67 हजार 706 विद्यार्थ्यांची निवड झाली; मात्र विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद लाभल्याने प्रवेशासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली. यानंतरही 46 हजार 842 विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्‍चित केले. यानंतर तब्बल अडीच महिन्यांनंतर म्हणजे 15 जूनला दुसरी सोडत काढण्यात आली; मात्र तोपर्यंत शाळा सुरू झाल्याने अनेक पालकांनी मिळेल त्या शाळेत पाल्यांचे प्रवेश निश्‍चित केले. त्यामुळे दुसऱ्या सोडतीलाही पालकांचा फारच अल्प प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या सोडतीमध्ये राज्यातून केवळ 20 हजार 212 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला; तर मुंबईतून 887 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 

राज्यभरात दुसऱ्या सोडतीनंतर आतापर्यंत 67 हजार 54 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आरटीई प्रवेशांतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा उद्देश असला तरी या प्रक्रियेमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी व सरकारी अनास्था यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत आहेत. 

अनागोंदी कारभाराचा फटका 
यंदाही सरकारच्या अनागोंदी कारभाराचा फटका आरटीई प्रवेश प्रक्रियेला बसला आहे. प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यांनतरही तब्बल 49 हजार 754 जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेशाच्या हजारो जागा रिक्त असताना तिसऱ्या फेरीबाबत शिक्षण विभागाकडून कोणतीही घोषणा करण्यात येत नसल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE half empty seats!