टोलनाक्‍यांवर गोंधळ, महामार्गावर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

मुंबई - हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे काळा पैशावाल्यांना घाम फुटला असला तरी सर्वसामान्यांचे यामुळे हाल झाले आहेत. काळा पैशांविरोधातील या सर्जिकल स्ट्राईकने राज्यातील महामार्गांवर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई - हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे काळा पैशावाल्यांना घाम फुटला असला तरी सर्वसामान्यांचे यामुळे हाल झाले आहेत. काळा पैशांविरोधातील या सर्जिकल स्ट्राईकने राज्यातील महामार्गांवर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे.

टोलनाक्‍यावर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने महामार्गांवर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर लगाम लावण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्याचे जाहीर केले होते. मोदी सरकारच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. पण बुधवारी सकाळपासून दैनंदिन कामकाजात यामुळे अडथळे येऊ लागले आहेत. वांद्रे-वरळी सी लिंकवर टोलनाक्‍यावरील कर्मचाऱ्यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे अवघ्या काही काळात सी लिंकवर भीषण वाहतूक कोंडी झाली. अखेरीस आणखी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी पाचशे आणि हजारच्या नोटी स्वीकारायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. टोलनाक्‍यावर पाचशे आणि हजारच्या नोटांवरुन गोंधळ सुरु असल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे.

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवहार मंदावले होते. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा कोणीच स्वीकारत नव्हते. पण नंतर शेतक-यांचे नुकसान होऊ नये यासाठी व्यापा-यांनी माल खरेदी करण्यास सुरुवात केली. क्रॉफर्ड मार्केटमध्येही याचे परिणाम दिसत असून या बाजारपेठेत ग्राहकांच्या संख्येत तब्बल 60 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. बाजारात सध्या कुठेही हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जात नाही. तर दुसरीकडे एटीएम आणि बॅंक बंद असल्याने आता काय करायचे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Web Title: Rush on Highway, toll plaza