'बंटी पाटील की हसन मुश्रीफ'; ऋतुराज पाटील यांनी केली कोणाची निवड?

टीम ई-सकाळ
Friday, 17 January 2020

काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील पेचात पडले होते. ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यात त्यांनी कोणाची निवड करतील, याची उत्सुकता होती.

संगमनेर (नगर) : विकासकामं, तरुण नेतृत्व, घराणेशाही, अपेक्षाचं ओझं, अशा सगळ्याविषयांवर चर्चा झाली आणि शेवटी आला अवधूत गुप्ते यांचा रॅपिड फायर राऊंड. अडचणीत टाकणाऱ्या या राऊंडमध्ये काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील पेचात पडले होते. ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यात त्यांनी कोणाची निवड करतील, याची उत्सुकता होती. अखेर विचार करून त्यांनी शेवटी काकांनाच निवडले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय होता कार्यक्रम?
संगमनेरमध्ये आज, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने युवा आमदारांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, झिशान सिद्दीकी आणि ऋतुराज पाटील सहभाग झाले होते. राज्यातील तरुण आमदार आणि मंत्र्यांची ही फळी पहिल्यांदाच सभागृहात आली आहे. यातील काहींना समाजकारणाचा तर काहींना थोडा राजकारणाचा अनुभव आहे. यामुळेच त्यांच्याशी खुल्या संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

आणखी वाचा - 'हॅलो मोदीसाहेब रोहित पवार बोलतोय, नाव ऐकलचं असेल'

रॅपिड फायर राऊंड
अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमाप्रमाणं इथही रॅपिड फायर राऊंड केला. त्यात प्रत्येक नेत्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. सुरुवात ऋतुराज पाटील यांच्याकडूनच झाली. बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात मुरब्बी कोण आहे? या प्रश्नावर ऋतुराज पाटील पेचात पडले. थोडा विचार करून, ऋतुराज यांनी 'बंटी काका' असं उत्तर दिलं. अवधूतनं मासा की तांबडा रस्सा, असा प्रश्नही विचारला होता. त्यात ऋतुराज यांनी अर्थात तांबडा रस्सा निवडला. कॉलेजचं आयुष्य की आमदार की? या प्रश्नावर त्यांनी, 'आमदारकीमध्ये काम करायला मिळतं, त्यामुळं आमदारकी निवडतो,' असं उत्तर दिलं.

पत्नी पूजाला केला फोन
अवधूत गुप्ते यांच्या खुपते तिथं गुप्ते या कार्यक्रमातील एका सेगमेंटप्रमाणे, या कार्यक्रमातही 'मॅजिक फोन' देण्यात आला होता. यात एखाद्या व्यक्तीला फोन केल्याचं दाखवून, त्याला आजवर जे बोलता आलेलं नाही, ते बोलायचं, अशी अटक होती. ऋतुराज पाटील यांनी पत्नीला फोन केला आणि 'लग्नानंतर निवडणुकीमुळं तुला वेळ देता आला नाही, आता तुला वेळ देईन', अशी ग्वाही दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ruturaj patil answer on rapid fire round sangamner program avdhoot gupte