#SaathChal दोन पिढ्यांमधील सुसंवादासाठी...

राजाराम वाघ
मंगळवार, 17 जुलै 2018

‘सकाळ’ आणि फिनोलेक्‍स केबल कंपनीच्या ‘साथ चल’अभिनव उपक्रमात आपल्या संस्कृतीतील आई-वडिलांचे महत्त्वपूर्ण स्थान अधोरेखित झाले. मुलांनी आईवडिलांना सांभाळायला हवे. ज्येष्ठांनीही बदलत्या पिढीशी जुळवून घ्यावे. 

‘सकाळ’ आणि फिनोलेक्‍स केबल कंपनीच्या ‘साथ चल’अभिनव उपक्रमात आपल्या संस्कृतीतील आई-वडिलांचे महत्त्वपूर्ण स्थान अधोरेखित झाले. मुलांनी आईवडिलांना सांभाळायला हवे. ज्येष्ठांनीही बदलत्या पिढीशी जुळवून घ्यावे. 

संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आई-वडिलांसाठी दोन पावले चालण्याच्या ‘साथ चल’ या सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल कंपनीच्या अभिनव उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव,’ या संस्कृतीचे दर्शन झाले. आजच्या परिस्थितीत दोन पिढ्यांच्या नातेसंबंधातील धाग्यांचे दृढीकरण करण्यासाठी ज्येष्ठ पिढीने आपली मानसिकता बदलावी. 

आपल्या वेगळ्या राहणाऱ्या मुलांशी वाद न घालता दोघांनीही एकमेकांशी सातत्याने संपर्क ठेवून, सणावाराला एकत्र यावे. एकत्र कुटुंबातील ज्येष्ठांनी घरातील आणि घराबाहेरील सोपी कामे करावीत. त्यांचे उपयुक्तता मूल्य वाढून, उपद्रवमूल्य कमी होईल.

ज्येष्ठांनी मुले तसेच नातवंडे, सुनांचे वाढदिवस साजरे केले पाहिजेत. तरुण पिढीनेदेखील आई-वडिलांची पंचाहत्तरी आणि सहस्रचंद्रदर्शन हे सोहळे नातेवाइकांबरोबर साजरे करावेत. 

ज्येष्ठांनी वर्तमानात जगले पाहिजे. आजचे प्रश्‍न, आजच्या समस्या यांना सामोरे जाण्याची मानसिकता हवी. आमच्या वेळी असे होते, असे नव्हते अशी विधाने करून तरुण पिढीला हिणवू नका. तोंडात साखर आणि डोक्‍यावर बर्फ ठेवल्यास तुमचा रक्तदाब स्थिर राहील. मुंबईकर चाकरमाने दरवर्षी गणपती व होळीला कोकणातील आपल्या गावी येतात. आई-वडिलांना भेटतात. नातेवाइकांची आस्थेवाइकपणे चौकशी करतात.

परदेशातील मुलांच्या पालकांची ‘नृपो’ (एनआरआय पेरेंट्‌स असोसिएशन) नावाची एक संघटना आहे. हे पालक एकमेकांस मदत करतात. पालकही वर्षातून एकदा मुलांना भेटण्यासाठी परदेशी जातात. मुलेही अधूनमधून भारतात येतात. रक्ताचे नाते इतर नात्यापेक्षा श्रेष्ठ असते, अशी एक इंग्रजी म्हण आहे.

कविवर्य पी. सावळाराम यांच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास -
तुळशीमाळ घालुनि गळा, 
कधी नाही कुटले टाळ।
पंढरीला नाही गेलो,
चुकूनिया एक वेळ।।
देव्हाऱ्यात माझे देव, 
ज्यांनी केला प्रतिपाळ।
चरणांची त्याच्या धूळ, 
रोज लावी कपाळाला।
विठ्ठल तो आला, 
आला, मला भेटण्याला।।

Web Title: #SaathChal two generations communication