आजचा दिवस बळिराजासाठी..!

farmers suicide
farmers suicide

अन्नत्याग आंदोलनाच्या "सकाळ'च्या आवाहनास प्रतिसाद 
मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर राजकारण होत असताना, यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्याने कुटुंबीयांसह केलेल्या आत्महत्येला रविवारी (ता.18) 31 वर्षे पूर्ण होत आहेत.

देशातील पहिली शेतकरी आत्महत्या अशी "अधिकृत सरकारी नोंद' असलेल्या या घटनेस कर्जबाजारीपणा आणि नापिकी हे मुख्य घटक कारणीभूत ठरले होते. 31 वर्षांनंतरही या परिस्थितीत तसूभरही फरक पडलेला नाही. याच पार्श्‍वभूमीवर अमर हबीब यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आज महागाव येथील चिलगव्हाण गावात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. आपल्या अन्नदात्याबाबत सहवेदना दर्शविण्याबाबत "सकाळ'ने केलेल्या आवाहनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील शेकडो नागरिक आपापल्या परिसरात सहभागी होणार आहेत. 

"सकाळ'ने साहेबराव करपे पाटील यांनी आत्महत्या केलेल्या त्या दिवसाची नुसती आठवण म्हणून नव्हे; तर आपल्यासाठी अन्न पिकवणाऱ्या, अन्नदात्याची जाणीव म्हणून नागरिकांनी या दिवशी उपवास आंदोलनाचे एक भाग व्हावे, असे आवाहन केले होते. त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद देत हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत, नोकरदारांपासून व्यावसायिकांपर्यंत, शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत, सामाजिक कार्यकर्त्यांपासून राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच स्तरांतील नागरिकांचा त्यात समावेश आहे. राज्यभरात ठिकठिकाणी हे आंदोलन होणार आहे. 

अवघा समाज शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. अन्नत्याग आंदोलनातील सर्वसामान्यांचा सहभाग हे त्याचेच प्रतीक आहे; मात्र शेतकऱ्यांनी हताश होऊन आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये. त्यामुळे समस्या सुटणार नाही. सरकारनेही मानसिक खच्चीकरण होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी समुपदेशन करण्याचा प्रयत्न करावा. 
- संदीप पाठक, अभिनेता

विदर्भात आज अन्नत्याग आंदोलन 
नागपूर - नापिकी, शेतमालाला अपुरा भाव व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येची राज्यात पहिली धक्कादायक नोंद झाल्याच्या घटनेला रविवारी (ता. 19) 31 वर्षे पूर्ण होत आहेत. साहेबराव पाटील करपे या शेतकऱ्याने 19 मार्च 1986 रोजी पत्नी व चार अपत्यांसह आत्महत्या केली होती. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी उद्या अन्नत्याग आंदोलनाचे आयोजन केले आहे. 

विधान भवन परिसरात शेतकऱ्यांना आदरांजली 
यवतमाळ :
चिलगव्हाण येथे गावकरी उद्या अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विधान परिषदेचे आमदार ख्वाजा बेग यांनी साहेबराव करपे व शेतकरी आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधान परिषदेत साहेबराव करपे व सर्व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बेग यांनी नियम शेतकरी आत्महत्येत झालेली वाढ, शासनाच्या चुकलेल्या धोरणावर चर्चा करण्यासाठी प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी केली. या वेळी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, हरिभाऊ राठोड, प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण उपस्थित होते. 

अमरावती - पंचवटी परिसरातील डॉ. पंजाबराव देशमुख पुतळ्यासमोर एक दिवस उपवास आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश साबळे; तसेच शेतकरी नेते विजय विल्हेकर म्हणाले, आंदोलनामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे 100 कुटुंबांतील सदस्य, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होतील. 

चांदूरबाजार : किसानपुत्र आंदोलनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे उपवास करण्यात येणार आहे. या उपवासाला सकाळी नऊपासून सुरवात होऊन सायंकाळी पाचपर्यंत ते चालणार आहे. 

दर्यापूर : किसान आंदोलन समितीच्या येथील शाखेतर्फे सकाळी दहा ते दुपारी पाचपर्यंत बस स्थानकासमोर उपवास करण्यात येणार आहे. समितीतर्फे उपविभागीय अधिकारी राठोड, तहसीलदार तायडे यांना निवेदन देण्यात आले. 

वर्धा - महात्मा गांधी पुतळ्यापुढे अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल. या वेळी जनमंचचे जिल्हा संयोजक हरीश इथापे, ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्त्या तसेच करपे कुटुंबावर अंत्यसंस्कार करणाऱ्या सुमनताई अग्रवाल, स्वामिनी दारूबंदी आंदोलनाचे संयोजक महेश पवार आदी सहभागी होतील. 

चंद्रपूर - किसानपुत्र फाउंडेशनचे कार्यकर्ते अन्नत्याग उपोषण करणार आहेत. या वेळी साहेबराव करपे आणि देशभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com