पूजा बिरारी 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' ची ब्यूटी क्वीन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय

‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय
पुणे - गुलाबी थंडी... वातावरणात प्रसन्नता... नृत्याविष्कार अन्‌ विविध कलांचा संगम... त्यातच प्रत्येकाला उत्सुकता होती तो क्षण जवळ येत होता... कारण, ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धेची अंतिम फेरी सुरू झाली... त्यातून तरुणींचे स्वप्नही पूर्ण होणार होते. रॅम्पवॉक अन् विविध फेऱ्यांनंतर नाशिकची वेदिका मुठे हिचा द्वितीय, तर पुण्याची सिमरन नाईक हिचा तृतीय क्रमांक आल्याची घोषणा झाली अन सर्वांचे लक्ष लागले मुख्य विजेतीच्या नावाचे... त्यातून स्पर्धक तरुणींच्या हृदयाचे ठोके वाढू लागले अन पुण्याच्या पूजा बिरारी हिच्या नावाची घोषणा करण्यात आली, अन् तिला मानाचा ‘क्राउन’ मिळाला. 

हडपसर येथील अमनोरा द फर्न हॉटेल ॲण्ड क्‍लबमध्ये शनिवारी पी. एन. गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. मिसेस इंडिया नेहा केळकर-देशपांडे, मॉडेल आणि अभिनेता राकेश बापट आणि एम. जे. तरुण यांनी कार्यक्रम होस्ट केला. परीक्षक डॉ. रेणू गाडगीळ, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, सिद्धार्थ जाधव, सई लोकूर, रेशम टिपणीस, प्रार्थना बेहेरे, मुग्धा गोडसे, नियती जोशी, मृण्मयी कोळवलकर यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्याचदरम्यान नम्रता गायकवाड आणि ग्रुपने नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते.

लवेल प्रभू यांनी कोरिओग्राफ केलेल्या शोमध्ये श्रुती-मंगेश या दांपत्यांनी डिझाईन केलेले इथनिक कपडे परिधान करून अंतिम फेरीतील २० तरुणींनी पहिल्या फेरीत पाश्‍चिमात्य संगीतावर रॅम्पवॉक केला. त्यानंतर पारंपरिक ढोल-ताशांच्या संगीतावर प्रत्येकीचा वैयक्तिक रॅम्पवॉकही झाला.

यादरम्यान, ऑलिंपियाड किड्‌स या संस्थेतील ६ ते १० वयोगटांतील मुलांनी तीन अंकी संख्यांचा गुणाकार, बेरीज व ५० च्या पुढील पाढे काही सेकंदांमध्ये म्हणून दाखवले. चिमुकल्यांच्या या बुद्धिमत्तेला सर्वांनीच भरभरून दाद दिली. मृदंग डान्स अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला.
टॅलेंट राउंडमध्ये १२ तरुणींची निवड करण्यात आली. त्यासाठी प्रत्येकीला दोन मिनिटांचा वेळ दिला. त्यामध्ये स्पर्धक तरुणींनी लावणी, पाश्‍चिमात्य नृत्यासह संगीत अन नाट्यही सादर केले. विविध कलागुणांचा संगम होत गेल्याने वातावरण बहरून गेले. त्यातच हस्ताक्षर तज्ज्ञ प्रदीप क्रिपलानी यांनी परीक्षकांना स्वाक्षरी करायला सांगितली. त्यावरून अचूकपणे त्यांचा स्वभाव सांगितला. त्यामुळे परीक्षकही चकित झाले. या कार्यक्रमानंतर सर्व तरुणींनी वेस्टर्न ड्रेस घालून रॅम्पवॉक केला. त्यातून नऊ जणींची निवड करण्यात आली. प्रत्येक तरुणीला काही चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी निवडायला सांगण्यात आले. त्यामध्ये ज्या परीक्षकाचे नाव असेल त्यांनी तिला प्रश्‍न विचारला. त्याला त्यांनी उत्तरेही दिली. काही तरुणींनी प्रेम, आत्मविश्‍वास, मूल्ये या विषयावर भाष्यही केले अन्‌ मोठ्या हास्यविनोदात तर कधी धीरगंभीर होत ही फेरी पार पडली.

राधा-कृष्ण, घुमर-घुमर या गाण्यावर नृत्याविष्कार सादर करून अभिनेत्री शर्वरी जमेनीस हिने वातावरणात रंगत आणली. हे सुरू असतानाच सर्वांना आतुरता होती तो क्षण जवळ आला. सर्व तरुणी पुन्हा रॅम्पवर आल्या. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता अन मनामध्ये धडधडही वाढत होती.

त्याचवेळी वैयक्तिक पारितोषिके जाहीर करण्यात आली. वेदिका मुठे हिचा द्वितीय तर सिमरन नाईक हिचा तृतीय क्रमांक आल्याचे जाहीर करण्यात आले अन त्यांच्या डोक्‍यावर क्राऊन घालण्यात आला. आता सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोचली होती. कारण, कोण होणार ‘सकाळ ब्यूटी क्वीन ऑफ महाराष्ट्र’ याचीच उत्सुकता होती. सर्वांचे कान ‘त्या’ नावाकडे लागले अन परीक्षकांनी पूजा बिरारी हिचे नाव घोषित केले अन सर्वत्र जल्लोष सुरू झाला. परीक्षक डॉ. रेणू गाडगीळ यांच्या हस्ते पूजाला मानाचा क्राऊन घालण्यात आला. त्या वेळी पूजासह तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. 

हुतात्म्यांना श्रद्धांजली
सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र स्पर्धेची अंतिम फेरी सुरू करण्यापूर्वी पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नेहा देशपांडे-केळकर हिने सर्वांना उभे राहण्याची विनंती केली. सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

माझे सर्वांत मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. मॉडेलिंगसाठीची ही माझी पहिलीच स्पर्धा होती. त्यामुळे ती खूप महत्त्वाची होती आणि त्याला माझ्या दृष्टीने खूप महत्त्व होते. मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करण्यासाठीचे पहिले पाऊल या स्पर्धेच्या माध्यमातून अचूक पडले आहे. लवेल प्रभू यांच्या ट्रेनिंगमुळेही फायदा झाला.
- पूजा बिरारी, विजेती, सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र

सकाळपासूनच मला अंतिम फेरीची उत्सुकता होती. त्यामुळे फेरी सुरू झाल्यानंतर मी आत्मविश्‍वासाने रॅम्पवर गेले. माझे नाव घोषित झाले अन्‌ मानाचा क्राउन मिळाला. स्वप्न सत्यात उतरलं, पण त्यावर विश्‍वास बसत नव्हता. सर्व मैत्रिणींची साथ मिळाली.
- वेदिका मुठे, द्वितीय

सर्व सहकारी मैत्रिणी अन् कुटुंबीयांमुळेच मला हे यश संपादन करता आले. या स्पर्धेसाठी मी अनेक दिवस मेहनत घेत होते. त्यामुळे आत्मविश्‍वास वाढत गेला. परंतु, तरीही धाकधूक होती. माझे नाव घोषित केल्यानंतर मला विश्‍वासच बसला नाही. पण, नंतर खूप आनंद झाला.
- सिमरन नाईक, तृतीय

Web Title: Sakal Beauty of Maharashtra 2019 Result