देशातली सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा आज 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

चार गटांत स्पर्धा 
महाराष्ट्र आणि गोव्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. सहभागासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. 
"गट अ' - इयत्ता पहिली व दुसरी 
"गट ब' - इयत्ता तिसरी व चौथी 
"गट क' - इयत्ता पाचवी ते सातवी 
"गट ड' - इयत्ता आठवी ते दहावी 
वेळ - "अ' व "ब' गटांसाठी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 
"क' व "ड' गटांसाठी सकाळी 9 ते 10.30 

पुणे -  रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी (ता. 16) सकाळी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत आहे. राज्यातल्या महानगरांपासून ते खेड्यापाड्यातील ही स्पर्धा केंद्रे रविवारी सकाळी नव्या कल्पनांचे रंग घेऊन येणाऱ्या बालचित्रकारांचे स्वागत करायला सज्ज झाली आहे. देशातल्या या सर्वांत विद्यार्थिप्रिय स्पर्धांमध्ये गेल्या 33 वर्षांत मिळून एक कोटींहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे या स्पर्धेलाही बालचित्रकारांनी आपली कल्पनाशक्तीचे रंग कागदावर उतरविण्यासाठी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. 

महाराष्ट्र आणि गोव्यातील आदिवासी आश्रमशाळा आणि विशेष मुलांसाठीच्या शाळांतील विद्यार्थीही या स्पर्धेत सहभागी होत आहेत. शाळांद्वारे नावनोंदणी न करता आलेल्या मुला-मुलींना थेट त्यांच्या जवळच्या केंद्रावर जाऊन स्पर्धेत भाग घेता येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. 

उमलत्या पिढीला सर्जनशीलतेच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी "सकाळ'ने सुरू केलेल्या उपक्रमाचे हे 33वे वर्ष आहे. लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणारे उपक्रम हा "सकाळ'च्या वाटचालीतला महत्त्वाचा भाग आहे. "मुले हेच आपले भविष्य आहे', हा "सकाळ'च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने "सकाळ'च्या वतीने मुलांसाठी "सकाळ एनआयई' आणि "सकाळ यंगबझ' यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. तीन पिढ्यांना जोडणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. 

झेड.एफ. इंडिया प्रा.लि. यंदा स्पर्धेचे टायटल प्रायोजक, इंडियन ऑइल कॉर्पोरेट पार्टनर, झी युवा एंटरटेन्मेंट पार्टनर आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी व सृजन कॉलेज ऑफ डिझाइन सहप्रायोजक आहेत. 

यंदाही ही स्पर्धा इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. "गट अ' - इयत्ता पहिली व दुसरी, "गट ब' - इयत्ता तिसरी व चौथी, "गट क' - इयत्ता पाचवी ते सातवी व "गट ड' - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल. 

दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद "सकाळ'तर्फे विनामूल्य दिला जाईल. मात्र स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्याबरोबर आणावयाचे आहे. 

स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. 

चार गटांत स्पर्धा 
महाराष्ट्र आणि गोव्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. सहभागासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. 
"गट अ' - इयत्ता पहिली व दुसरी 
"गट ब' - इयत्ता तिसरी व चौथी 
"गट क' - इयत्ता पाचवी ते सातवी 
"गट ड' - इयत्ता आठवी ते दहावी 
वेळ - "अ' व "ब' गटांसाठी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 
"क' व "ड' गटांसाठी सकाळी 9 ते 10.30 

स्पर्धेला जाताना... 
- चित्र काढण्यासाठी स्पर्धक काळी किंवा रंगीत पेन्सिली, क्रेयॉन्स (रंगीत खडू), पोस्टर कलर्स, ऍक्रॅलिक कलर्स, स्केच पेन्स आदी माध्यमांचा स्वतंत्र किंवा एकत्रित वापर करू शकतात. 
- चित्र काढताना आकारांची मांडणी, लय, हावभाव, प्रमाणबद्धता याकडे लक्ष द्या. 
- चित्र दिलेल्या वेळेत पूर्ण करा. 
- तुमचे चित्र कोणत्याही चित्राची प्रतिकृती असू नये. ती तुमची स्वतःची अभिव्यक्ती असावी 
- चित्र काढताना नवनवीन पद्धतींचा वापर करून चित्रकलेतला आनंद घ्या. आपल्या मनातील भाव कागदावर उतरविण्याचा प्रयत्न करा. 
- स्पर्धेत भाग घेऊन मज्जा करा, आनंद लुटा. 
- सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! 

अधिक माहितीसाठी -www.chitrakala.esakal.com 

Web Title: sakal drawing competition 2018 Today largest drawing competition country