‘सकाळ’ चित्रकला स्पर्धाच नं.१

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’कडून शिक्कामोर्तब

‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’कडून शिक्कामोर्तब
पुणे - रंगरेषेच्या माध्यमातून आपल्या मनातील भावविश्‍व आज (रविवार) चिमुकल्या हातांनी अलगदपणे कागदावर उलगडले ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने. राज्याच्या कानाकोपऱ्यांत दोन हजारांहून अधिक केंद्रांवर पावणेआठ लाखांहून अधिक शालेय विद्यार्थी सहभागी झाले. या अफाट सहभागाचा आनंद द्विगुणित करणारा विक्रमही आजच स्पर्धेत नोंदवला गेला. ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या दोन्हीही संस्थांनी ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ अशी ठळक नोंद घेतली. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली ही स्पर्धा ताज्या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे.

‘सकाळ’तर्फे गेली ३३ वर्षे राज्यात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या तेव्हाच्या ‘विद्यार्थ्यांची’ मुलेही आता या स्पर्धेत आपल्या कलेची झलक दाखवत आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळकरी मुलाचं या चित्रकला स्पर्धेशी अतूट नातं निर्माण झालं आहे. दर वर्षीप्रमाणेच यंदाही या स्पर्धेत राज्यातील अगदी छोट्या गावांमधील शाळांमधूनही विद्यार्थी सहभागी झालेच, तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थी आणि दिव्यांगांनीही या स्पर्धेत आपल्यातील कलेची मोहोर उमटवली. या स्पर्धेत दर वर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे जागतिक संघटनांनी दखल घेतली अन्‌ ‘सर्वाधिक मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम रविवारी प्रस्थापित झाला. ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या दोन्ही संस्थांनी या विक्रमाची नोंद घेऊन त्याचे प्रमाणपत्र ‘सकाळ’कडे प्रदान केले. ‘अशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ अधिकृत परीक्षक डॉ. मनोज तत्‌वादी यांनी याबाबतचे प्रमाणपत्र आणि पदक ‘सकाळ’चे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर महेंद्र पिसाळ यांच्याकडे सुपूर्त केले. या वेळी संपादक सम्राट फडणीस आणि वितरण विभागाचे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे, ‘विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्ट’चे संचालक रामकृष्ण बेटावदकर, विश्वकर्मा विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद नेमाडे, मुख्याध्यापिका मधू शितोळे, मुख्याध्यापिका सुनंदा सरडे उपस्थित होते.

डॉ. तत्‌वादी म्हणाले, ‘‘दोन्हीही संस्थांनी ‘सकाळ’च्या बालकुमार चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे विक्रम नोंदविला आहे. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’साठी दोन लाख स्पर्धक आणि ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’साठी तीन लाख स्पर्धकांचे लक्ष्य निश्‍चित केले होते. रविवारी सकाळी अकरा वाजता राज्यभरातून या स्पर्धेत दिलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त स्पर्धक रंगरेषांच्या स्पर्धेत सहभागी झाले. त्यामुळे दोन्ही संस्थांनी या स्पर्धेची आपल्या विक्रमाची नोंद केली आहे.’’ 

‘‘हा नवा उच्चांक घडवताना ‘सकाळ’आधी असलेल्या कोणाचाही विक्रम मोडला नाही. तर, या स्पर्धेच्या माध्यमातून विक्रमाची स्वतंत्र वर्गवारी तयार केली आहे. यामध्ये एका दिवशी, एका वेळी, राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी, एका विशिष्ट ध्येयासाठी म्हणजेच चित्रकला स्पर्धेसाठी शालेय विद्यार्थ्यांना एकत्र आणणे, या प्रयत्नांनी एक स्वतंत्र वर्गवारी तयार झाली आहे. यापूर्वी गुजरातमध्ये ‘वन्य प्राणी वाचवा’ या संकल्पनेवर शालेय विद्यार्थ्यांना एकत्र आणले होते. मात्र, चित्रकला स्पर्धा, एकाच दिवशी, एकाच वेळी, विविध ठिकाणी आणि शालेय विद्यार्थी या निकषांच्या आधारावरही आता उच्चांक निर्माण झाला आहे,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुलांचा उत्साह
शाळांचा परिसरात आजच्या सुटीच्या दिवशीही मुलांचा आवाजाने गजबजला होता. आजचा दिवस त्यांच्यासाठी खास होता, हे त्यांच्या चेहऱ्यांवरून स्पष्ट दिसत होते. पेन्सिल, रंगपेटी असे साहित्य घेऊन मुलांचे घोळके सकाळी प्रसन्न वातावरणात शाळेत येत होते. काही शाळांच्या आवारात रांगोळी काढली होती, तर काही ठिकाणी फुलांची सजावट केली होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात, स्वच्छ सूर्यप्रकाशात ही मुले एकत्र बसली आणि एका मागून एक रंगरेषा त्यांच्या कागदावर उमटू लागल्या. आपल्या आवडत्या विषयावरील चित्र रेखाटताना प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. त्याच आनंदात कागदावर विविधरंगी छटा उमटत होत्या. विद्यार्थी आपल्या चित्राशी एकरूप झाला होता. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेतील शिक्षक होते. चांगले चित्र काढ, असे सांगणारे पालकही आवर्जून शाळेत आले होते, असे चित्र राज्यातील शाळा-शाळांमधून दिसत होते...

तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेली आणि सर्वांत मोठी अशी ही चित्रकला स्पर्धा आहे, इतकेच स्पर्धेचे वैशिष्ट्य नाही, तर या स्पर्धेत दोन पिढ्या सहभागी झाल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला विचार करायला लावेल आणि त्यातून स्वतःला अभिव्यक्त होण्याची संधी मिळेल, असे वैविध्यपूर्ण विषय हे या स्पर्धेचे वेगळेपण आहे. जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन यातून मुलांना मिळतो. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
- मृणाल पवार, संचालिका, सकाळ माध्यम समूह. 

Web Title: Sakal Drawing Competition Number one Asia Book of records India Book of Records